बसचा भीषण अपघात, १७ जणांनी गमावला जीव
एका बस अपघातात १७ जणांचा मृत्यू झालाय तर ३५ जण जखमी झालेत
मैनपुरी, उत्तरप्रदेश : उत्तरप्रदेशात एक मोठा अपघात झालाय. एका बस अपघातात १७ जणांचा मृत्यू झालाय तर ३५ जण जखमी झालेत. जखमींपैंकी ७-८ जण गंभीर जखमी असल्याचं सांगण्यात येतंय. बस दुभाजकावर आदळल्यानं हा अपघात झालाय. दुभाजकावर आदळल्यानंतर बस उलटली आणि या दुर्घटनेत अनेकांना आपले प्राण गमवावे लागलेत. उत्तरप्रदेशातील मैनपुरी भागात हा अपघात घडलाय. जखमींना जवळच्याच एका रुग्णालयात हलवण्यात आलंय. ॉ
मिळालेल्या माहितीनुसार, डबल डेकर खाजगी बस जयपूरहून कन्नौजच्या गुरसहायगंजला जात होती. सकाळी जवळपास पावणे पाचच्या सुमारास कीरतपूर गावाच्या जवळ दुभाजकावर आदळल्यानंतर बस पलटली.
कशी घडली ही घटना
ड्रायव्हरला बस चालवताना झोप अनावर होऊन ही दुर्घटना घडली, असं म्हटलं जातंय. यूपी ७६ के ७२७५ या क्रमांकाची ही खाजगी बस होती. रात्री १० च्या सुमारास प्रवाशांना घेऊन या बसनं आपला प्रवास सुरू केला होता. या बसमध्ये जवळपास ९० प्रवासी प्रवास करत होते.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनानं रेस्क्यू ऑपरेशन चालवलं... जवळपास १२ अॅम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यातून मृतदेह आणि जखमींना जवळच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केलंय.