PM Narendra Modi Jacket : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी सोमवारी बेंगळुरूमध्ये भारत ऊर्जा सप्ताहाचा (India Energy Week) शुभारंभ केला. यावेळी इंडियन ऑईलतर्फे (Indian Oil) पंतप्रधान मोदी यांना एक अनोखी भेट देण्यात आली. पीएम मोदी यांना एक जॅकेट भेट देण्यात आलं. पण हे जॅकेट साधंसुधं नाहीए तर ते चक्क प्लास्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर करून तयार केलेले जॅकेट आहे. विशेष म्हणजे कंपनीने पेट्रोल पंप आणि एलपीजी एजन्सींवर तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी असा गणवेश बनवण्याची योजना आखली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनबॉटल इनिशिएटिव्ह
या अनोख्या संशोधनाला अनबॉटल इनिशिएटिव्ह (Unbottled) असं नाव देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे एक गणवेश बनवण्यासाठी 28 बाटल्यांचा पुनर्वापर केला जात असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. यानुसर कंपनीने दरवर्षी 100 दशलक्ष प्लास्टिक बाटल्यांचे पुनर्वापर करण्याची योजना आखली आहे. यामुळे गणवेश तर होईलच शिवाय पर्यावरणाचा ऱ्हासही होणार नाही. कपडे तयार करण्यासाठी पाण्याचा मोठ्या प्रमाणावर पाण्याचाही वापर होतो. म्हणजे कॉटनच्या कपड्यांना रंग देण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर होतो. पण अनबॉटल इनिशिएटिव्हमध्ये पाण्याच्या एका थेंबाचाही वापर होत नाही. प्लास्टीक बाटल्यांचा वापर करून सशस्त्र दलांसाठी नॉन-कॉम्बॅट युनिफॉर्म बनवण्याची आयओसीची योजना आहे.


मोदींनी केलं कौतुक
पंतप्रधान मोदी यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं आहे, हरित वाढ आणि ऊर्जा संक्रमणाच्या दिशेने भारताचं हे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. 'रिड्यूस, रियुज आणि रिसायकल ('Reduce, Reuse, Recycle) हा मंत्र प्रत्येकाने जपला पाहिजे, आणि याचं हे उत्तम उदाहरण असल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे. फॅशन जगतासाठी हे एक महत्त्वाचं पाऊल ठरणार आहे. शिवाय दरवर्षी अशा 100 दशलक्ष बाटल्यांच्या पुनर्वापराचे उद्दिष्ट पर्यावरणाच्या संरक्षणासाठीही उपयोगी ठरेल, असं पीएम मोदी यांनी सांगितलं.


एका जॅकेटसाठी किती बाटल्यांचा वापर
इंडियन ऑईल पीएम मोदी यांना जे जॅकेट भेट दिलं आहे त्यासाठीचा कपडा तामिळनाडूतील करुरमधील श्री रेंगा पॉलीमर्समध्ये तयार करण्यात आला आहे. प्लास्टिक बाटल्यांपासून असे तब्बल 9 रंगांचं कापड तयार करण्यात आलं आहे. यापैकी मोदींना चंदनाच्या रंगाचं जॅकेट भेट म्हणून देण्यात आलं. कपडा तामिळनाडूमध्ये तयार करण्यात आला आहे, तर गुजरातमधल्या टेलरकडून हे जॅकेट शिवून घेण्यात आलं आहे. एक जॅकेट बनवण्यासाठी साधारण 15 बाटल्या वापरल्या गेल्यात, तर संपूर्ण गणवेश तयार करण्यासाठी सरासरी 28 बाटल्या वापरल्या जातात.


पाण्याचा वापर नाही
प्लास्टिकच्या बाटल्यांपासून बनवलेल्या कपड्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे या कपड्याला रंग देण्यासाठी पाण्याच्या एका थेंबाचाही वापर केला जात नाही. कॉटन कपड्यांना रंग देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर होतो, तर प्लास्टिक बाटल्यांपासून बनवलेल्या कपड्यांमध्ये डोप डाईंगचा वापर केला जातो. प्लास्टिक बाटल्यांपासून आधी फायबर तयार करण्यात येतं आणि त्यापासून सूत तयार केलं जातं. त्या सूताचं कापड तयार करुन शेवटी त्याचा गणवेश बनवतो. रिसायकल केलेल्या बाटल्यांपासून बनवलेल्या जॅकेटची किरकोळ बाजारात किंमत 2,000 रुपये इतकी आहे.


ग्रीन टेक्नोलॉजी अंतर्गत हा कपडा तयार केला जातो. यासाठी समुद्रातून वाहून आलेल्या आणि जमिनीवर पडलेल्या बाटल्यांचा वापर केला जातो. श्री रेंगा पॉलीमर्स ही देशातील प्लास्टीकपासून कपडे बनवणारी एकमेव कंपनी असल्याचा दावा कंपनीचे मॅनेजिंक पार्टनर सेंथिल शंकर यांनी केला आहे. तसंच त्यांच्या कपड्यावर एक क्यूआर कोड आहे, ज्याला स्कॅन केल्यास कंपनीची संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता. ही कंपनी इंडियन ऑईलबरोबर पार्टनरशिपमध्ये काम करत आहे. टी-शर्ट आणि शॉर्टस बनवण्यासाठी 5 ते 6 बाटल्या, टी-शर्ट बनवण्यासाठी 10 आणि फूल पँट बनवण्यासाठी 20 बाटल्यांचा वापर होतो.