पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात, गोव्यात पर्रिकरांची प्रतिष्ठा पणाला
दिल्ली, गोवा आणि आंध्र प्रदेशातील चार विधानसभेच्या जागांवर पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे.
नवी दिल्ली : दिल्ली, गोवा आणि आंध्र प्रदेशातील चार विधानसभेच्या जागांवर पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे.
नवी दिल्लीतील बवाना, आंध्र प्रदेशातील नांदयाल, गोव्यातील पणजी आणि वालपोई या विधानसभांच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरु झाली आहे. मतदान प्रक्रिया सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. या निवडणुकांचे निकाल २८ ऑगस्ट रोजी येणार आहेत.
मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांची प्रतिष्ठा पणाला
पणजी पोटनिवडणुकीत भाजपतर्फे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर, काँग्रेसतर्फे गिरीश चोडणकर, गोवा सुरक्षा मंचतर्फे आनंद शिरोडकर आणि अपक्ष उमेदवार केनेथ सिल्वेरा असे चार उमेदवार रिंगणात आहेत. पर्रीकर आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे विश्वासू गिरीश चोडणकर यांच्यात चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.
वाळपई मतदारसंघात भाजपतर्फे आरोग्यमंत्री विश्वजित राणे, काँग्रेसतर्फे रॉय नाईक आणि अपक्ष उमेदवार रोहिदास गावकर हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सकाळपासून मतदान केंद्राबाहेर चांगली गर्दी बघायला मिळत आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान होणार असून २८ ऑगस्टला सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल.
दिल्लीतील बवाना सीटवर विजय मिळविण्यासाठी काँग्रेसला एक संधी आहे. तर, आम आदमी पक्षाला आपलं वर्चस्व ठेवण्यासाठी टक्कर द्यावी लागेल. आम आदमी पक्षाचे आमदार वेद प्रकाश यांनी राजीनामा दिल्यामुळे या जागेवर पोटनिवडणुक होत आहे.
आंध्र प्रदेशात तेलगुदेसम पक्षाचे आमदार भुमा नागिरेड्डी यांच्या निधनामुळे नांदयाल जागेवर पोटनिवडणुक होत आहे. या ठिकाणी मतदारांमध्ये चांगला उत्साह असल्याचं पहायला मिळत आहे. मतदान केंद्रांबाहेर मतदारांच्या रांगा दिसत आहेत.