नवी दिल्ली :  बवाना पोटनिवडणुकीत चुरस पाहायला मिळाली. सर्वप्रथम भाजप उमेदवार आघाडीवर होता. मात्र, त्यानंतर पांचव्या फेरीत काँग्रेसचा उमेदवार आघाडीवर राहिला आणि भाजप दुसऱ्या तर आप उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होता. मात्र, ११ व्या फेरीत आप उमेदवाराने आघाडी घेत  भाजप आणि काँग्रसेला दे धक्का देत विजय मिळवला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशात तीन राज्यांमधील विधानसभेतील चार जागांसाठी पोटनिवडणूक झाली होती. गोव्यातील पणजी, वालपोई,  दिल्लीतील बवाना आणि आंध्रप्रदेशमधील नंद्याल या चार जागांसाठी पोटनिवडणूक झाली. सोमवारी कडेकोट बंदोबस्तात मतमोजणीला सुरुवात झाली.


दिल्लीतील बवाना येथे आप, भाजप आणि काँग्रेस या पक्षांमध्ये खरी लढत पाहायला मिळाली. महापालिका निवडणुकीतील पराभवानंतर 'आप'साठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. 'आप'चे राम चंदर हे २४ हजार मतांनी विजयी झाले. या निवडणुकीत राम चंदर यांना ५९, ८८६ मते मिळाली. तर भाजपच्या वेद प्रकाश यांना ३५, ८३४ आणि काँग्रेसच्या सुरेंदर कुमार यांना ३१, ९१९ मते मिळाली.


तर गोव्यात पुन्हा एकदा मनोहर पर्रिकर यांचा करिष्मा दिसून आला. त्यांनी पणजीची निवडणूक जिंकली तर वालपोईत विश्वजीत राणे यांनी विजय मिळला. त्यामुळे भाजपला दोन्ही जागा राखण्यात यश आले.


तसेच आंध्रप्रदेशमधील नंद्याल येथे सत्ताधारी तेलगू देसम पक्ष आणि वायएसआर काँग्रेस यांच्यात लढत झाली. पोटनिवडणुकीत या मतदारसंघात तब्बल ७९. १३ टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीत तेलगू देसमचे उमेदवार आघाडीवर आहेत.