नवी दिल्लीः निवडणुकीचे सर्व्हे करणारी एजेंसी C-Voter ने एप्रिल-मेमध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या ४ महिने आधी एक ओपिनियन सर्व्हे केला आहे. या सर्व्हनुसार २०१९ मध्ये पुन्हा एकदा केंद्रात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भाजपची सत्ता येण्याची शक्यता आहे. भाजप आणि मित्र पक्ष मिळून एनडीएला एकूण ५४५ पैकी २९१ जागा मिळण्याची शक्यता आहे. पण उत्तर प्रदेशमध्ये सपा आणि बसपाच्या युतीमुळे एनडीएला फटका बसणार आहे.


राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्व्हनुसार विधानसभा निवडणुकीत ज्या राज्यांमध्ये भाजपने सत्ता गमवली आहे. तेथे लोकसभा निवडणुकीत भाजपला चांगलं यश मिळण्याची शक्यता आहे. भाजपला छत्तीसगडमध्ये ११ पैकी ५, राजस्थानमध्ये २५ पैकी १९ तर मध्य प्रदेशमध्ये २९ पैकी २३ जागा मिळू शकतात. येथील स्थानिक लोकांनी जरी भाजपला मतं दिली नसली तरी केंद्रात त्यांनी मोदीच पंतप्रधान हवे आहेत असं या सर्व्हेमधून समोर आलं आहे.


पूर्वेकडील राज्यांमध्ये कोण बाजी मारणार?


एनडीए पूर्वेकडील राज्यांमध्ये चांगली कामगिरी करताना दिसत आहे. ओडिसामध्ये एनडीएला २१ पैकी १५, पश्चिम बंगालमध्ये ४२ पैकी ९ आणि बिहारमध्ये ४० पैकी ३५ जागा मिळू शकतात. पूर्वोत्तरमध्ये एकूण २५ पैकी १९ जागा एनडीएला मिळू शकतात. पण एनडीएला दक्षिण भारतात मोठं नुकसान होऊ शकतं. दक्षिणेतील एकूण १२९ जागांपैकी भाजपला फक्त १५ जागा मिळण्याची शक्यता आहे.


सर्व्हेनुसार तमिळनाडुमध्ये काँग्रेसने जर डीएमके सोबत युती केली तर येथे काँग्रेसला फायदा होऊ शकतो. आंध्र प्रदेशमध्ये टीडीपीला चांगलं यश मिळू शकतं. दक्षिण भारतात यूपीएला २०१९ मध्ये चांगल्या जागा मिळू शकतात.


उत्तर प्रदेशवर सगळा खेळ


२०१९ ची लोकसभा निवडणूक कोण जिंकणार हे उत्तर प्रदेशच्या जनतेच्या हातात आहे. लोकसभेच्या ८० जागा असलेल्या या राज्यात सपा आणि बसपा एकत्र निवडणूक लढवणार असल्याने याचा फटका एनडीएला बसण्याची शक्यता आहे. पण राज्यात जर सपा, बसपा, काँग्रेस आणि भाजप असा चौरंगी सामना झाला तर मात्र भाजपला ७२ जागा मिळू शकतात. पण जर सपा-बसपाने एकत्र निवडणूक लढवली तर भाजपला २८ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर सपा-बसपाला ५० जागा मिळण्याची शक्यता आहे.


महाराष्ट्रात धक्का बसणार?


पश्चिम भारतात गुजरातमध्ये भाजपला २६ पैकी २४ जागा मिळू शकतात. पण महाराष्ट्रात ४८ पैकी फक्त १८ जागा मिळण्याची शक्यता आहे. अगामी निवडणुकीत यूपीएला १७१ जागा मिळू शकतात. यूपीमध्ये सपा-बसपा एकत्र आले तर राज्यात त्यांची एक मोठी ताकद दिसू शकते.