कोबीला कवडीमोल भाव, शेतकरी संकटात
एक रुपया प्रति किलो असे कोबीचे दर घसरल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
बेळागाव : एक रुपया प्रति किलो असे कोबीचे दर घसरल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे सरकारने कोबी खरेदी करून योग्य हमी भाव द्यावा या मागणीसाठी रयत संघटनेच्यावतीने शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं.
कोबीची पोती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठेवत, कोबी हातात घेत शेतक-यांनी हे ठिय्या आंदोलन छेडलं. गेल्या महिन्याभरात कोबी डोक्यावर घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करायची ही दुसरी वेळ आहे.
कडोली इथल्या शेतकरी नेते अप्पासाहेब देसाई यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. राज्य सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई घोषित करून कोबी शासनाने खरेदी करावा अन्यथा शेतकऱ्यांसमोर आत्महत्या हाच पर्याय राहिल असा इशारा देसाई यांनी दिला आहे. यावेळी कडोली भागातील शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली.