सद्य केंद्रीय मंत्रिमंडळाची आज अखेरची बैठक, उद्या सत्तास्थापनेचा दावा
२६ मेला मोदींच्या अध्यक्षतेखाली भाजपा संसदीय पक्षाची बैठक होणार आहे
नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक २०१९ च्या निकालात प्रचंड बहुमताने विजयानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय मंत्रिमंडळाची अखेरची बैठक बोलावली आहे. १६ वी लोकसभा बरखास्त करण्यासाठी मंत्रिमंडळ प्रस्ताव मंजूर करेल. ही बैठक संध्याकाळी ५ वाजता होणार आहे. त्यानंतर भाजपाचे नव्याने निवडून आलेले खासदार शनिवारी दिल्लीत नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. त्यानंतर भाजपातर्फे राष्ट्रपतींची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला जाईल. त्यानंतर शपथविधीचा कार्यक्रम निश्चित केला जाईल.
२६ मेला मोदींच्या अध्यक्षतेखाली भाजपा संसदीय पक्षाची बैठक होणार आहे. त्यात मोदींना अधिकृतरित्या भाजपा नेता निवडलं जाईल.
दरम्यान, निकालात भाजपाला तीनशे जागांसह बहुमत मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीतल्या भाजपाच्या मुख्यालयात जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपाच्या खडतर प्रवासाचा लेखाजोखा माडंत विरोधकांचाही समाचार घेतला. लोकसभा निवडणुकीतल्या दणदणीत विजयानंतर भाजपाध्यक्ष अमित शाहांनी कार्यकर्त्यांसमोर नवं लक्ष्य ठेवलंय. ज्या राज्यात भाजपाचे सरकार नाही त्या राज्यांमध्ये भाजपा विस्तार करणार असल्याचं अमित शाह यांनी जाहीर केलंय.