`हारलेल्या पक्षासाठी काय प्रचार करायचा`; काँग्रेस खासदाराच्या वक्तव्याने खळबळ
पराभूत पक्षाचा प्रचार करण्यात काही अर्थ नाही, असंही या खासदाराने म्हटलं आहे
सततच्या पराभवानंतर काँग्रेस (Congress) पक्षाने पुन्हा पक्ष बांधणीस सुरवात केली आहे. काँग्रेसच्या नुकत्याच पार पडलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर (mallikarjun kharge) पक्षाला आता नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. तसेच कॉंग्रेस माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सुरु केलेल्या भारत जोडो यात्रेलाही (bharat jodo yatra) दक्षिणेत मोठा प्रतिसाद मिळत असल्याची माहिती समोर आली आहे. अशातच आता काँग्रेसच्या (Congress) एका स्टार प्रचारकानेच पक्षाला घरचा आहेर दिला आहे. तेलंगणातील (telangana) मुनुगोड पोटनिवडणुकीत (munugode by election) काँग्रेसच्या पराभवाचा दावा केला जात आहेत. काँग्रेसचे स्टार प्रचारक कोमातिरेड्डी वेंकट रेड्डी (Komatireddy Venkat Reddy) यांनी हा दावा केला आहे. या निवडणुकीत पक्षाला 10 हजार मतेही मिळवता येणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. त्याचवेळी त्यांनी भाजपच्या (BJP) विजयाचे भाकीत केले. नलगोंडा जिल्ह्यातील मुनुगोड या जागेसाठी 3 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. मात्र त्या आधीच कॉंग्रेस (Congress) नेत्याने केलेल्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. (campaign losing party said Congress star campaigner Komatireddy Venkat Reddy)
काँग्रेसने स्टार प्रचारक रेड्डी हे भुवनगरीचे खासदार आहेत. मुनुगोड विधानसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघांतर्गत येतो. सध्या तरी रेड्डी हे निवडणुकीपासून दूर असल्याचे दिसत आहे. नुकतेच ते कुटुंबासह ऑस्ट्रेलियाला रवाना झाले आहे. त्यानंतर आता मेलबर्न विमानतळावरचा त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते काँग्रेसच्या पराभवाबद्दल बोलत आहेत. विशेष म्हणजे रेड्डी यांचे बंधू राजगोपाल हे भाजपच्या तिकीटावर याच जागेवरून निवडणूक लढवत आहेत.
शनिवारी रेड्डी यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्याची माहिती समोर आली होती. 'पराभूत पक्षाचा प्रचार करण्यात काही अर्थ नाही. मी प्रचार केला तरी काँग्रेसला 10 हजार मतेही मिळणार नाहीत. पोटनिवडणुकीत मोठा खर्च करणाऱ्या केंद्रातील भाजप आणि राज्यातील तेलंगणा राष्ट्र समिती या दोन बड्या सत्ताधारी पक्षांशी काँग्रेस लढत आहे. काँग्रेस त्यांच्या पैशाच्या शक्तीचा सामना करू शकत नाही, असे खासदार रेड्डी म्हणाले. त्याचवेळी त्यांनी भाजपच्या विजयाबद्दलही भाष्य केले आहे.
काँग्रेस काय म्हणाली?
मुनुगोड येथील काँग्रेसच्या उमेदवार पालवाई श्रावंती यांनी रेड्डी यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. 'काही दिवसांपूर्वीच त्यांनी मला आशीर्वाद दिला आणि मला शुभेच्छा दिल्या. पोटनिवडणुकीत माझा प्रचार करण्याची विनंतीही त्यांनी मान्य केली होती, मात्र त्यांनी मला दुखावले आहे,' असे पालवाई श्रावंती म्हणाल्या.
दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ए रेवंत रेड्डी यांनी नाव न घेता हे षडयंत्र असल्याचे म्हटलं आहे. 'मला घेरले जात आहे. पक्षाचा पराभव निश्चित करून मला पीसीसी अध्यक्षपदावरून हटवण्याचे षडयंत्र रचले जात आहे, असे रेवंत रेड्डी म्हणाले.