नवी दिल्ली - देशाचा पुढील पंतप्रधान कोण असेल, हे ठरविण्यासाठी ज्या राज्याचे महत्त्व सर्वाधिक आहे, अशा उत्तर प्रदेशमधील राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच पुढील लोकसभा निवडणूक समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष या दोन्ही कट्टर विरोधकांनी एकत्र येऊन लढविण्याचे ठरविल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील भाजपचा पराभव करण्यासाठी एकीकडे काँग्रेस सर्वच विरोधकांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. पण काँग्रेसच्या आघाडीमध्ये न जाता सप आणि बसपने स्वतंत्रपणे उत्तर प्रदेशमध्ये आघाडी केली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील निवडणूक भाजप, सप-बसप आघाडी आणि काँग्रेस यांच्यात होईल. त्यात भाजप आणि सप-बसप आघाडी हे दोन्ही एकमेकांच्या समोर उभे ठाकणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सप आणि बसपच्या आघाडीमध्ये काँग्रेसला सहभागी करून न घेण्यात आल्यामुळे भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेस उत्तर प्रदेशमध्ये सप आणि बसपसोबत एकत्रपणे निवडणूक लढविणार नसल्यामुळे ही निवडणूक त्रिकोणी असेल. साधारणपणे दोन पक्षांमध्ये समोरासमोर होणाऱ्या लढाईपेक्षा त्रिकोणी किंवा बहुकोनी निवडणूक जास्त लक्षवेधक असते. असा स्वरुपाची निवडणूक झाली तर भाजपचा फायदा होऊ शकतो, असे काही अभ्यासकांचे म्हणणे आहे. पक्षांची जातीय आधाराची गणिते सोडली तर भाजपला विरोध करण्यासाठी इतर पक्षांकडे सर्वसाधारणपणे एकसारखेच मुद्दे असतात. त्यामुळे त्या मुद्द्यांना जोरदार प्रतिवाद केल्यास भाजपला त्याचा फायदा होऊ शकतो, असे काही अभ्यासकांनी म्हटले आहे. 


काँग्रेस आणि सप-बसप आघाडी वेगवेगळे लढल्यामुळे मतांचे विभाजन होईल, असेही काहीजणांनी म्हटले आहे. विशेषतः मुस्लिम मते एकगठ्ठा कोणत्याही एका पक्षाला मिळणार नाहीत. त्यांच्यामध्ये विभाजन झाल्यामुळे त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो. पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये याची शक्यता सर्वाधिक असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.


अभ्यासकांनी अजून एक मुद्दा मांडला आहे की राज्य पातळीवर जरी सप आणि बसपने आघाडी केली असली, तर त्यांची पारंपरिक व्होट बॅंक एकमेकांच्या उमेदवारांना मते द्यायला तयार होईल का, हा प्रश्न आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या दोन्ही पक्षांच्या मतदारांमध्ये एकमेकांविषयी कटुता आहे. त्यामुळे ते आघाडीतील दुसऱ्या पक्षाला मत द्यायला सहज तयार होणार नाही. आघाडीतील पक्षाचे मतदार बसपच्या उमेदवारांना मते देत नाहीत, याबद्दल मायावती यांनी याआधीही नाराजी व्यक्त केली होती.