मुंबई : Punjab Congress News : पंजाब काँग्रेसमधील राजकीय कलह थांबण्याचे नाव घेत नाही. कॅप्टन अमरिंदर सिंह (Amarinder Singh) यांनी मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर काँग्रेसला सतत अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. आता अमरिंदर सिंह यांनी पंजाबमध्ये नवीन पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. त्याचवेळी त्यांनी भाजपसोबत युती करुन निवडणूक लढवण्याचे संकेतही दिले आहेत. (Captain Amarinder Singh will form a new party, announced this on alliance with BJP)


भाजपसोबत युतीची शक्यता


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॅप्टन अमरिंदर सिंह यांचे मीडिया सल्लागार रवीन ठुकराल यांनी केलेल्या ट्विटनुसार, पंजाबच्या भविष्यासाठी लढा सुरूच राहणार आहे आणि पंजाब विधानसभा निवडणुकीत अमरिंदर यांचा पक्ष भाजपसोबत युतीही करू शकतो, असे त्यांनी म्हटले आहे. पंजाबमध्ये शांतता आणि स्थिरता आणण्याच्या उद्देशाने, हा निर्णय घेण्यात आला आहे, असे ते पुढे म्हणाले.


समविचारी लोकांना आमंत्रण


अमरिंदर सिंह यांच्यावतीने असे म्हटले गेले आहे की, अकाली गटांमधून विभक्त झालेल्यांसह समविचारी पक्षांसोबत युती करण्याचीही कल्पना आहे. याशिवाय जर शेतकऱ्यांचे आंदोलन त्यांच्या हिताच्या दृष्टीने सोडवले गेले तर पंजाबमध्ये भाजपसोबत युती होण्याचीही आशा आहे.


अमरिंदर सिंह यांनी नवीन पक्षाची घोषणा केल्यावर त्यावर राजकीय पक्षांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांनी सांगितले की, कॅप्टनचा पक्ष काही दिवसांनी भाजपची बी टीम असल्याचे सिद्ध होईल. ते म्हणाले की, ते अमित शाह यांना भेटण्यासाठी दिल्लीत आले होते, दोघांमध्ये काय चर्चा झाली हे माहित नाही.


काँग्रेस सोडण्याची केली घोषणा 



पंजाबचे मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतरच कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी स्पष्ट केले की ते आता काँग्रेसमध्ये नाहीत. त्यांनी म्हटले होते की ते अपमान सहन करणार नाहीत आणि यापुढे काँग्रेसमध्ये राहणार नाहीत. कारण त्यांच्याशी जे वागले गेले ते योग्य नाही. काँग्रेस हायकमांडने अलीकडेच अमरिंदर सिंह  यांच्याकडून मुख्यमंत्रीपद काढून चरणजीत चन्नी यांना पंजाबचे मुख्यमंत्री बनवले होते आणि त्यामागचे कारण नवज्योतसिंह सिद्धू आणि कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यातील वाद असल्याचे मानले जात होते.


मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अमरिंदर सिंह यांनी सिद्धू यांना देशद्रोही आणि पाकिस्तान समर्थक म्हटले होते. त्याचवेळी त्यांनी जाहीर केले होते की, जर पंजाब निवडणुकीत काँग्रेसने सिद्धूला चेहरा बनवले तर ते त्यांच्या विरोधात उमेदवार उभे करण्यास तयार आहेत.