नवी दिल्ली: गेल्या काही महिन्यांपासून देशातील वाहन उत्पादन क्षेत्रात प्रचंड मंदी असल्याचे आकडे समोर येत आहेत. आता यासंबंधी आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यानुसार या क्षेत्रात गेल्या चार महिन्यांमध्ये ३.५ लोकांनी रोजगार गमावला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक दुचाकी आणि कार उत्पादकांनी आपले कारखाने बंद केले आहेत. 'रॉयटर्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, वाहन उत्पादक, सुटे भाग आणि डिलर्सकडून मोठ्याप्रमाणावर कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे.


यापैकी दुचाकी उत्पादक कंपन्यांनी देशभरात १५ हजार आणि तर सुट्या भागांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी तब्बल एक लाख कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवल्याचे समजते. 


जाणकारांच्या मते हा या क्षेत्रातील आतापर्यंतचा सर्वात वाईट कालखंड आहे. त्यामुळे मोदी सरकारपुढे मोठे संकट उभे राहिले आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या काळातही बेरोजगारांची संख्या झपाट्याने वाढत आहे.


देशातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी असलेल्या मारुती सुझुकीने आपल्या उत्पादनात तब्बल २५.१५ टक्क्यांनी घट केली आहे. उत्पादन कपात करण्याचा हा सलग सहावा महिना आहे. जुलै महिन्यात मारुती सुझुकीने १,३३, ६२५ वाहनांची निर्मिती केली होती. गेल्यावर्षी याच काळात मारुतीने १,७८,५३३ वाहनांची निर्मिती केली होती. 


तर टाटा मोटर्सकडून गेल्या दोन आठवड्यांमध्ये आपले चार प्रकल्प बंद केल्याचे समजते. पुरवठा आणि मागणीत प्रचंड तफावत असल्यामुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचे टाटा मोटर्सच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. तर महिंद्राकडूनही एप्रिल ते जून या काळात काही दिवस उत्पादन बंद ठेवण्यात आले होते. 


या संकटातून बाहेर पडण्यासाठी वाहनक्षेत्राकडून सरकारकडे जीएसटी कमी करण्याची मागणी केली जात आहे. या क्षेत्राला काहीबाबतीत सूट मिळावी, अशी मागणी आम्ही सरकारकडे केली आहे. त्यामुळे आता सरकार लवकरच वाहन क्षेत्रासाठी नवे धोरण आखेल, अशी प्रतिक्षा वाहन उत्पादकांना आहे.