सूरत : आपल्या काळजाचा तुकडा घरी सोडून कामावर जाणं प्रत्येक आईसाठी खूप जास्त वेदनादायी असतं. बऱ्याचदा नाईलाज म्हणून अनेक महिलांवर ही वेळ येते. मात्र आपल्या मुलाला सांभाळण करणाऱ्या केअरटेकरची सगळी माहिती काढणं गरजेचं आहे. नाहीतर त्याचे गंभीर परिणाम आपल्या चिमुकल्या जीवाला भोगावे लागतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही बातमी वाचून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल. केअरटेकर महिलेकडे आपला काळजाचा तुकडा निर्धास्तपणे सोडून गेलेल्या महिलेला एक मोठा धक्का बसला आहे. केअरटेकर महिलेनं आपला राग या चिमुकल्यावर काढला आणि तेच त्याच्या जीवावर बेतलं. 


नेमकं काय आहे प्रकरण? 


8 महिन्यांच्या चिमुकल्याचा सांभाळ करणाऱ्या महिलेनं त्याला रागाच्या भरात 5 मिनिटं धरून आपटलं. रागावर नियंत्रण न राहिल्यानं या महिलेनं हे केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर चिमुकला बेशुद्ध पडला. हा सगळा प्रकार या चिमुकल्याचे आई-वडील घरी नसताना घडला. 


चिमुकल्याच्या जीवाला धोका


जेव्हा आई-वडील घरी पोहोचले तेव्हा त्यांना आपलं बाळ बेशुद्ध अवस्थेत असलेलं दिसलं. आईच्या काळजाचा ठोका चुकला आणि त्यांनी तातडीनं जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. तेव्हा डॉक्टरांनी जे सांगितलं त्याने महिलेच्या पायाखालची जमीन सरकली. 


डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार चिमुकल्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. ब्रेन हॅमरेज झाल्यामुळे 8 महिन्यांचा चिमुकला कोमामध्ये गेला होता. 


सीसीटीव्हीमधून मोठा खुलासा


या सगळ्या प्रकारानंतर आई-वडिलांनी घरातील सीसीटीव्ही व्हिडीओ तपासला. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा झाला आहे. यामध्ये चिमुकल्याचा सांभाळ करणाऱ्या महिलेनं त्याला 5 मिनिटं जोरात आपटल्याचं दिसत आहे. तर चिमुकला जीवाच्या आकांतानं ओरडत होता. मात्र आरोपी महिलेला त्याची कोणतीही दया आली नाही. 


वडिलांनी दाखल केली तक्रार


वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेला 3000 हजार रुपये पगार होता. ती गेल्या 3 महिन्यांपासून बाळाची काळजी घेत होती. या महिलेचं नाव कोमल असल्याची माहिती दिली आहे. वडिलांनी आरोपी महिलेविरोधात मुलाची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार दाखल केली आहे.


काय काळजी घ्यावी


अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी पालकांनी आधी केअरटेकरची पूर्ण माहिती घेणं आवश्यक आहे. याच दरम्यान त्या महिलेची किंवा मुलीची कोणती मेडिकल हिस्ट्री आहे का? हे तपासून घेणं आवश्यक आहे.