जुनागढ : गुजरातमधील जुनागढ जिल्ह्यात एक पूल मध्येच तुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पूल मधो-मध तुटला असून पूलावरुन जात असलेल्या ४ गाड्या नदीमध्ये वाहून जाण्यापासून अगदी थोडक्यात बचावल्या आहेत. या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले असून गाड्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रस्त्यांवरुन जाणाऱ्या लोकांच्या मदतीने दुर्घटनेत अडकलेल्या लोकांना वाचवण्यात आलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवारी मलंका गावाजवळ जुनागढ - मुंद्राला जोडणारा एक पूल मधूनच तुटला. मधूनच पूल कोसळल्याने पूलावरुन जाणारी वाहनं नदीत लटकलेल्या अवस्थेत राहिली. पूल मध्येच तुटल्याचं पाहताच काही लोकांनी पुढे येत दुर्घटनेत अडकलेल्यांना बाहेर काढत, त्यांना नदीत बुडण्यापासून वाचवलं.



दुर्घटनेत अनेक लोक जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णलयात दाखल करण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. या दुर्घटनेत कोणतीही जिवितहानी झालेली नाही.


या भागात सतत होणारा पाऊस हे या दुर्घटनेचं कारण मानलं जात आहे. पावसाच्या पाण्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूला मातीची धूप होत जाऊन, जमिन सरकून पूल मध्येच कोसळला असल्याची शक्यता स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.