मिर्झापूर: आगामी लोकसभा निवडणुकीत मतदारांनी केवळ स्वत:च्या फायद्याचा विचार करून मतदान करावे, असे आवाहन काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केले. त्या मंगळवारी उत्तर प्रदेशच्या मिर्झापूर येथे बोलत होत्या. यावेळी त्यांनी म्हटले की, तुम्ही सध्या इतरांच्या फायद्यासाठी मतदान करत आहात. मात्र, मतदान करताना तुम्ही स्वत:चा फायदा लक्षात घेणे गरजेचे आहे. राजकारण हे जनतेच्या कल्याणासाठी असले पाहिजे. काँग्रेस पक्ष अशाप्रकारचे सर्वसमावेशक राजकारण करत असल्याचेही प्रियंका यांनी सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, आज प्रियंका पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लोकसभा मतदार संघ असलेल्या वाराणसीत दाखल होणार आहेत. प्रियांकांच्या या दौऱ्यामुळे काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय. याठिकाणाही त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मोदींना लक्ष्य केले. प्रियंका यांनी म्हटले की, मोदींच्या हुकूमशाही राजकारणाचा सर्वात मोठा बळी देशातील संस्था ठरल्या आहेत. गेल्या पाच वर्षांमध्ये भाजपने प्रसारमाध्यमांसह देशातील प्रत्येक संस्थेवर पद्धतशीरपणे आक्रमण केले. मात्र, ही गोष्ट लक्षात येणार नाही, इतपत जनता मूर्ख नाही, हे मोदींनी ध्यानात घेतले पाहिजे, असे यावेळी प्रियंका यांनी म्हटले. 



प्रियंका यांच्या आजच्या वाराणसी दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. यादरम्यान त्या अस्सी घाट आणि काशी विश्वनाथाच्या मंदिरात जाणार आहेत. प्रियंका यांचा हा दौरा राजकीय वर्तुळाच्या कुतूहलाचा विषय आहे. उत्तर प्रदेशचे प्रभारीपद स्वीकारल्यानंतर प्रियंका या भागात प्रचंड सक्रिय झाल्या आहेत. इंदिरा गांधी यांच्याशी असलेल्या सार्धम्यामुळे लोकांमध्ये त्यांच्याविषयी प्रचंड आकर्षण आहे. मात्र, प्रियंका हे आकर्षण मतांमध्ये परावर्तित करू शकणार का, यावरच काँग्रेसची उत्तर प्रदेशातील घौडदौड अवलंबून आहे.