नवी दिल्ली : योगायोग म्हणा किंवा भारतातील कायदा व सुव्यवस्था पाहणाऱ्या यंत्रणांची गतीमानता म्हणा, कॉंग्रेस पक्ष दिवसेंदिवस अडचणींच्या गर्तेत अधिकच गुरफटत चालला आहे. देशभरातील अनेक उद्योगपती, राजकीय नेते, त्यांचे नातेवाईक, संस्था यांच्याभोवतीचा फास आवळल्यावर सीबीआयने आपला मोर्चा रॉबर्ट वढेरा यांच्याकडे वळवला आहे. त्यामुळे येत्या काळात कॉंग्रेसचा एकखांबी तंबू असलेल्या गांधी परिवारावर काय बालंट येणार याबाबत उत्सुकता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सीबीआयने राजस्थानमधील जमीन वाटपाशी संबंधीत सुमारे १८ प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल केला आहे. ज्यात रॉबर्ट वढेरा यांच्या जमिनीचाही समावेश आहे. रॉबर्ट वढेरा हे साधेसुधे व्यक्तिमत्व नाही. रॉबर्ट वढेरा हे नाव उच्चारताच त्याचा थेट गांधी परिवार आणि कॉंग्रेसशी संबंध जोडला जातो. कारण, वढेरा हे प्रियांका गांधी यांचे पती आणि देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी तसेच, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई आहेत.
वढेरा अडचणीत आले आहेत, त्या जमीन प्रकरणाशी निगडीत असलेल्या १८ प्रकरणांचा तपास सीबीआयने सुरू केला आहे.


राजस्थानातील वसुंधरा सरकारने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला होता. राजस्थानातील बिकानेर येथे तब्बल २७० एकर जमिनीचे वाटप करण्यात आले. हे वाटप चुकिच्या पद्धतीने करण्यात आले असून, या जमिनीतील बराच हिस्सा वढेरा यांच्या कंपनीने खरेदी केला होता. दरम्यान, केवळ राजकीय द्वेषातूनच हा आरोप केला जात असल्याची टीका करत काँग्रेसने हा आरोप फेटाळून लावला आहे.


दरम्याम, वढेरा जमीन प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून कारवाई गतीमान करण्यात आली आहे. याच वर्षात साधारण पाच महिन्यांपूर्वी (एप्रिल २०१७) वढेरा यांच्या निकटवर्तीयांवर अंमलबजवनी संचलनालयाने (इडी) छापेमारी केली होती. वरवर पाहता ही कायदेशीर कारवाई आहे. तसेच, याचा राजकारणाशी संबंध नाही, असे दिसत असले तरी, येत्या काळात काँग्रेस आणि भाजपात चांगलेच शितयुद्ध पहायला मिळेल हे नक्की.