स्वयंघोषित `मॅसेंजर ऑफ गॉड` बलात्कार प्रकरणी दोषी
डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरुमित राम रहीम सिंग यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या बलात्काराच्या खटल्यात न्यायालयानं राम रहीमला दोषी ठरवलं. पंचकुला सीबीआय कोर्टानं हा निर्णय दिलाय.
चंदीगड : डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरुमित राम रहीम सिंग यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या बलात्काराच्या खटल्यात न्यायालयानं राम रहीमला दोषी ठरवलं. पंचकुला सीबीआय कोर्टानं हा निर्णय दिलाय.
राम रहीम याच्यावर त्याच्या आश्रमातील दोन साध्वींवर १५ वर्षांपूर्वी बलात्कार केल्याचा आरोप सिद्ध झालाय. राम रहीमला २८ ऑगस्ट रोजी शिक्षा सुनावण्यात येईल. कोर्टातून राम रहीमची थेट तुरुंगात रवानगी करण्यात येणार आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
गुरुवारी सकाळी जवळपास ९.३० वाजता गुरमीत राम रहीम सिरसापासून जवळपास ४०० गाड्यांच्या ताफ्यासह पंचकुला न्यायालयात दाखल झाला होता. परंतु, न्यायालयाच्या परिसरात केवळ दोन गाड्यांनाच जाण्यासाठी परवानगी देण्यात आली. त्यानंतर समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली होती.
२००२ साली डेरा सच्चा सौदामधल्या एका साध्वीनं तत्कालिन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना पत्र लिहून आपल्यावर झालेल्या अत्याचाराची कहाणी कथन केली होती. एका निनावी पत्रामध्ये गुरमित राम रहीम यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला होता. हरियाणातल्या सिरसा इथल्या डीएसएस मुख्यालयात घटना घडल्याचा पत्रात उल्लेख यात करण्यात आला होता. यानंतर पंजाब आणि हरियाणा हायकोर्टानं राम रहीम याच्याविरोधात सूमोटो याचिका दाखल करून घेतली
राम रहीमचे समर्थक रस्त्यावर
पंचकुलामध्ये बाबाचे हजारो समर्थक रस्त्यावर दाखल जालेत. त्यामुळे पंजाब, हरियाणाच्या अनेक रस्त्यांना छावणीचं स्वरुप प्राप्त झालंय.
राम रहीम यांच्याविरोधात निकाल लागल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पंजाब व हरयाणामधील मोबाइल व इंटरनेट सेवा ७२ तासांसाठी बंद केली आहे. तसेच चंडीगडमधील सर्व सरकारी कार्यालयांना आज सुट्टी देण्यात आली आहे. पंचकुला जिल्ह्यातील शाळा, कॉलेजही बंद ठेवण्यात आली आहेत. पंजाब व हरयाणाच्या दिशेने येणाऱ्या सर्व ट्रेनही रद्द करण्यात आल्या आहेत.