सीबीआयच्या नव्या संचालकांची संघाशी जवळीक?
नागेश्वर राव यांची भाजपचे नेते राम माधव यांच्याशी असलेली जवळीकही राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय आहे.
नवी दिल्ली: केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागातील (सीबीआय) उच्चपदस्थांमध्ये सुरु असलेला वाद सध्या देशभरात चांगलाच गाजत आहे. सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी सीबीआयचे विद्यमान संचालक आलोक शर्मा यांच्यावरील आरोपांची चौकशी १० दिवसांमध्ये करण्याचे आदेश केंद्रीय दक्षता आयोगाला दिले. त्याचवेळी हंगामी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेले एम. नागेश्वर राव यांच्या अधिकारांवरही निर्बंध घालण्यात आले आहेत.
एम. नागेश्वर राव यांच्या संचालकपदी करण्यात आलेल्या नियुक्तीला सुरुवातीपासूनच काँग्रेसचा आक्षेप होता. राव यांच्यावर अनेक आरोप आहेत. अशा व्यक्तीचा संचालकपदी नियुक्ती करणे योग्य नसल्याचे काँग्रेसने म्हटले होते.
या सगळ्या घडामोडींनंतर आता एम. नागेश्वर राव यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेले कनेक्शन समोर आले आहे. 'द इकॉनॉमिक टाईम्स'च्या माहितीनुसार सरकारी नियंत्रणाखाली असणाऱ्या मंदिरांना स्वतंत्र करणे, अल्पंसख्याकांना झुकते माप देणारे कायदे रद्द करणे आणि गोमांस निर्यातीवर बंदी घालण्यासाठी सरकारवर दबाव निर्माण करणाऱ्या संघटनांची सूत्रे हलवण्यात नागेश्वर राव यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
याशिवाय, नागेश्वर राव यांची भाजपचे नेते राम माधव यांच्याशी असलेली जवळीकही राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय आहे. त्यामुळेच नागेश्वर राव राम माधव यांच्या इंडिया फाऊंडेशन आणि विवेकानंद इंटरनॅशनल फाऊंडेशनच्या अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत असल्याचेही सांगितले जाते.
२३ सप्टेंबर रोजी जारी करण्यात आलेल्या 'चार्टर ऑफ हिंदू डिमांड्स' तयार करणाऱ्या सात लोकांपैकी राव हे सुद्धा एक आहेत. या चार्टरला लवकरच पंतप्रधानांसमोर ठेवण्यात येणार आहे. दिल्लीतील सृजन फाऊंडेशनतर्फे यासाठी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. राव यांनी या कार्यक्रमाला उपस्थित होते. डाव्या इतिहासकारांनी लिहिलेला हिंदू विरोधी आणि राष्ट्रविरोधी इतिहास बदलून हा इतिहास भारतीयांच्या नजरेतून मांडण्याचे काम करत असल्याचा दावा या संघटनेकडून करण्यात आला आहे.