नवी दिल्ली : सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेल्या सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांनी सरकारच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोईंच्या अध्यक्षतेखाली तीन न्यायमूर्तींचा समावेश असलेल्या खंडपीठासमोर ही सुनावणी होईल. त्यासोबतच प्रशांत भूषण यांच्या 'कॉमन कॉज' नावाच्या सामाजिक संस्थेनं दाखल केलेल्या याचिकेवरही वर्मा यांच्या याचिकेसोबतच सुनावणी होईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भूषण यांच्या संस्थेनं सीबीआयचे सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेले विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्याविरोधातील भ्रष्टाचाराच्या आरोपांची एसआयटी चौकशी करण्याची मागणी केलीय. 


दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीपूर्वी एक दिवस अगोदर सीबीआय प्रवक्त्यांनी आलोक वर्मा सीबीआय संचालक पदावर कायम राहतील तसंच राकेश अस्थाना विशेष संचालक पदावर कायम राहतील, असं म्हटलंय.  


जेव्हापर्यंत केंद्रीय सतर्कता आयोग या प्रकरणाची चौकशी करत राहील तेव्हापर्यंत एम नागेश्वर राव सीबीआय संचालक पदाचं काम पाहतील. 


राकेश अस्थाना आणि आलोक वर्मा या दोघांवरही भ्रष्टाचाराचे आरोप असून, त्यांना २३ ऑक्टोबरला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं होतं