Coronavirus : सीबीएसईची दहावी आणि बारावीची परीक्षा पुढे ढकलली
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा निर्णय
मुंबई : कोरोनाचं थैमान काही थांबायचं नाव घेत नाही. कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये म्हणून काही महत्वाचे निर्णय घेण्यात येत आहेत. शाळा, कॉलेजस बंद ठेवण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. १९ मार्च ते ३१ मार्च दरम्यान सीबीएससीचे दहावी आणि बारावीचे सर्व पेपर पुढे ढकलले. ३१ मार्चला परिस्थितीचा आढावा घेऊन नवीन वेळापत्रक जाहीर होणार.
कोरोनामुळे आतापर्यंत भारतात तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतात कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या ही १५० हून अधिक आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत ४२ कोरोनाग्रस्त रूग्ण आढळले आहेत. महाराष्ट्र आता कोरोनाच्या दुसऱ्या स्तरावर आहे. यामुळे अधिक काळजी घेतली जात आहे. शासकीय कार्यालयात आता ५० टक्के कर्मचारी उपस्थिती ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. याची उद्यापासून अमलबजावणी करण्यात येरणार आहे. तसेच रेल्वे, बस गाड्यांमधीलच प्रवाशी क्षमता कमी करणार. कोरोनाचा अधिक जोमाने मुकाबला करण्यासाठी संसर्ग कमी करण्यावर भर देण्यात येणार आहे. राज्यातील शासकीय कार्यालये एक दिवसाआड पद्धतीने रोज ५० टक्के कर्मचारी येतील या हिशोबाने सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच रेल्वे, एसटी बसेस, खासगी बसेस, मेट्रो आदी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही ५० टक्के प्रवासी क्षमतेने चालविण्यासाठी सूचना देण्यात आली आहे. मुंबईमध्ये बेस्टमधील उभे राहणारे प्रवाशी बंद. तसेच प्रवाशी अंतराने बसावेत यासाठी तशा सूचना देण्यात आली आहे. मुंबई शहरांमध्ये बसेसची संख्या वाढविण्यासाठी पर्यायी बसेसची व्यवस्था करण्यात येणार आहे.