`लढलो खरा... पण आज हार मानतोय`, सीसीडीच्या मालकाचं भावनिक पत्र
ते सोमवारपासून बेपत्ता आहेत.
मुंबई : 'कॅफे कॉफी डे' म्हणजेच 'सीसीडी' म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या भारतीय कॅफे संस्कृतीत महत्त्वाच्या स्थानावर असणाऱ्या या समूहाचे मालक व्ही.जी. सिद्धार्थ सोमवारपासून बेपत्ता आहेत. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस.एम. कृष्णा यांचे जावई असणारे सिद्धार्थ हे सोमवारी रात्रीपासूनच मंगळुरू येथून बेपत्ता आहेत. नेत्रावती नदीवरील पुलापाशी त्यांना कारमधून बाहेर पडताना शेवटचं पाहिलं गेलं होतं.
सिद्धार्थ यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. पण, अद्यापही त्याविषयीची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, सध्याच्या घडीला सिद्धार्थ यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी लिहिलेल्या एका पत्राने सर्वांनाच धक्का दिला आहे. झी बिझनेसने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार घरातून निघण्यापूर्वी त्यांनी हे पत्र लिहिलं होतं. ज्यामध्ये आपण, गेल्या बऱ्याच काळापासून परिस्थितीचा सामना करण्याचा प्रयत्न केला. पण, याहून जास्त तणाव आपण झेलू शकत नसल्याचं त्यांनी या पत्रात म्हटलं होतं.
'मी खूप काळापासून या सर्व परिस्थितीचा सामना केला. पण, आज मी यापुढे हात टेकले आहेत', असं म्हणत आपल्यावर एका बिझनेस पार्टनरकडून दबाव टाकण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा केला. कॅफे कॉफी डेच्या संचालक मंडळाला उद्देशून त्यांनी हे पत्र लिहिलं होतं.
सिद्धार्थ यांच्या बेपत्ता होण्याची माहिती मिळताच लगेचच स्थानिक प्रशासनाने हालचाली करत त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. जवळपास २०० हून अधिक पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. तर नेत्रावती नदीच्या पात्रात नौकादलानेही त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. उद्योग विश्वातील एका प्रसिद्ध व्यक्तीने परिस्थितीपुढे हतबल होत उचललेलं हे पाऊल पाहता सध्या अनेकांनीच खंत व्यक्त केली आहे.