Owaisi च्या ताफ्यावर हल्ला करतानाचा CCTV VIDEO आला समोर, दोन हल्लेखोरांकडून गोळीबार
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी (asaduddin owaisi) मेरठहून परतत असताना त्यांच्या ताफ्यावर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला. ओवेसींच्या गाडीवर झालेल्या गोळीबाराचं सीसीटीव्ही (CCTV) फुटेज आता समोर आलं आहे.
UP ELECTION 2022 : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी (asaduddin owaisi) मेरठहून परतत असताना त्यांच्या ताफ्यावर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला. ओवेसींच्या गाडीवर झालेल्या गोळीबाराचं सीसीटीव्ही (CCTV) फुटेज आता समोर आलं आहे.
हातात बंदूक घेऊन दोन जण कारवर गोळ्या झाडताना या व्हिडिओत दिसत आहे. मेरठ इथली प्रचारसभा आटपून परतत असताना हापुर जिल्ह्यातील छिजारसी टोल नाक्यावर गोळीबार झाल्याची माहिती ओवेसी यांनी दिली आहे.
हल्लेखोरांनी ओवेसींच्या ताफ्यावर गोळीबार केला आणि तिथून पळत गेले. धावत असताना एका हल्लेखोरला टोलनाक्यावरुन जाणाऱ्या एका दुसऱ्या कारचा धक्का लागून तो खाली पडल्याचंही या व्हिडिओत दिसत आहे.
त्याचवेळी, समोरून पांढरा शर्ट घातलेला आणखी एक तरुण हातात बंदूक घेऊन येताना दिसतोय. या व्यक्तीने ओवेसींच्या गाडीवर गोळीबार केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दुसऱ्या हल्लेखोराचा चेहराही स्पष्ट दिसत आहे.
हल्ल्यानंतर ओवेसींची प्रतिक्रिया
छिजारसी टोल नाक्यावर आपल्या ताफ्यावर गोळीबार झाला, ४ राऊंड फायर झाले, ३ ते ४ लोक होते, शस्त्र तिथेच टाकून हल्लेखोर पळून गेले. माझी गाडी पंक्चर झाली, मी दुसऱ्या गाडीत बसून तिथून निघालो, मी सुरक्षित आहे, असं ओवेसी यांनी म्हटलं आहे. मोदी सरकार आणि उत्तर प्रदेश सरकार या दोघांचीही या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची जबाबदारी आहे. एका खासदारावर गोळीबार कसा होऊ शकतो, असं ओवेसी यांनी म्हटलं आहे.
एक आरोपी अटकेत
हापूरचे एसपी दीपक भुकर म्हणाले की, सीसीटीव्हीच्या आधारे एका व्यक्तीची ओळख पटली आहे, आम्ही त्या व्यक्तीला तात्काळ ताब्यात घेतलं आहे, त्याची चौकशी सुरू आहे.
तपासासाठी 5 पथकं
उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यात AIMIM चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या वाहनावर झालेल्या गोळीबाराची माहिती देताना एडीजी (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार म्हणाले की, याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर इतरांना पकडण्यासाठी 5 पथके तयार करण्यात आली आहेत. मेरठचे आयजी स्वत: या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत.