उत्तर प्रदेशातील नोएडा येथे पुन्हा एकदा पाळीव कुत्र्यावरुन एका उच्चभ्रू सोसायटीत राडा झाला आहे. कुत्र्याला लिफ्टमधून नेण्यावरुन हा वाद झाला. यादरम्यान निवृत्त आयएएस अधिकारी आणि दांपत्यामध्ये जोरदार भांडण झालं. मारहाणीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओत महिला आणि निवृतत अधिकाऱ्यामध्ये हाणामारी होत असल्याचं दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पत्नीला कानाखाली मारल्याचं कळताच महिलेचा पती तिथे आला आणि निवृत्त आयएएस अधिकारी आर पी गुप्ता यांना मारहाण केली. घटना सेक्टर 108 स्थित पार्क्स लॉरिएट सोसायटीत (Parx Laureate Society) घडली आहे. दरम्यान, या भांडणानंतर दोन्ही बाजूंनी आपापसात हे प्रकरण मिटवलं.


मिळालेल्या माहितीनुसार, महिला आपल्या पाळीव कुत्र्याला लिफ्टमधून नेत होती. पण निवृत्त आयएएस अधिकारी याचा विरोध करत होते. ते तिला कुत्रा नेण्यापासून रोखत होते. यावरुन दोघांमध्ये लिफ्टजवळच शाब्दिक वाद सुरु झाला होता. यादरम्यान आयएएस अधिकाऱ्याने आपला मोबाईल काढला आणि रेकॉर्डिंग सुरु केली. यामुळे चिडलेल्या महिलेने मोबाईल खेचला आणि फेकून दिला. यामुळे संतापलेल्या अधिकाऱ्याने महिलेच्या कानशिलात लगावली. 


यानंतर वाद वाढला आणि हाणामारीच सुरु झाली. महिलेसह तिची मुलगीही या भांडणात सहभागी झाली. काही वेळाने महिलेचा पती आला आणि त्याने निवृत्त अधिकाऱ्याला मारहाण सुरु केली. 



या हाणामारीची महिती मिळताच कोतवाली सेक्टर 39 चे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सोसायटीमधील सीसीटीव्ही फुटेज तपासलं. सीसीटीव्हीत दोन्ही पक्ष हाणामारीत सहभागी असल्याचं दिसत होतं. पण कोणीही पोलिसांत तक्रार दाखल केली नाही. त्यांनी आपापसात हे प्रकरण मिटवलं. 


नोएडामधील अनेक उच्चभ्रू सोसायटींमध्ये पाळीव कुत्र्यावरुन सोसायटीमधील सदस्यांमध्ये वाद होत असतात. याआधी गौर सिटीच्या 7th अॅव्हेन्यूमध्येही असंच प्रकरण घडलं होतं. एक तरुण आपल्या कुत्र्याला लिफ्टमधून नेत होती. यामुळे लिफ्टमध्ये असणारा मुलगा घाबरला आणि रडू लागला. जेव्हा मुलाच्या आईने त्याला दुसऱ्या लिफ्टमधून जाण्यास सांगितलं तेव्हा त्याने वाद घातला. सुरक्षारक्षकाने टोकल्यानंतर तो त्यालाही भिडला. यानंतर एका महिलेनेही त्याला रोखलं आणि व्हिडीओ शूट करण्यास सुरुवात केली. यानंतर तो तेथून निघून गेला.