Elderly Man Dies In Bull Attack CCTV: भटक्या कुत्र्यांनी किंवा जंगली प्राण्यांनी हल्ला केल्याने एखाद्याचा मृत्यू झाल्याची बातमी तुम्ही यापूर्वी अनेकदा वाचली असेल. मात्र उत्तर प्रदेशमध्ये चक्क एका बैलाने मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका व्यक्तीचा जीव घेतल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. उत्तर प्रदेशमध्ये अशाप्रकारे एखाद्या वळूने किंवा भटक्या बैलाने एखाद्या व्यक्तीवर हल्ला केल्याची ही काही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही अनेकदा बैलांकडून असे हल्ले झाले आहेत. मात्र एखाद्या व्यक्तीचा बैलाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना यापूर्वी ऐकिवात नाही. 


नेमकं घडलं काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशमध्ये मागील काही काळापासून भटक्या जनावरांकडून नागरिकांवर हल्ला होण्याचे प्रकार वाढल्याचं पाहायला मिळत आहे. या समस्येवर स्थानिक प्रशासनाला कोणताही तोडगा काढता आलेली नाही. असं असतानाच बरेलीमध्ये मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका व्यक्तीचा वळूने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. ही वयस्कर व्यक्ती 24 जानेवारी 2024 रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडली होती. घरापासून काही अंतर चालत पोहचल्यानंतर या व्यक्तीला एका वळूने धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. 


ही व्यक्ती रस्त्याच्या बाजूने चालक असतानाच अचानक समोर आलेल्या वळूने या व्यक्तीला छातीवर धडक दिली. धडक बसताच ही व्यक्ती खाली कोसळली. मात्र या व्यक्तीच्या मदतीला कोणीच आलं नाही. ही व्यक्ती खाली पडल्यानंतरही बैल शिंगाने ठोसे देत होता. या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना संजय नगर पारिसरामध्ये घडली आहे. संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 


मरण पावलेल्या व्यक्तीचं नाव काय?


मरण पावलेल्या व्यक्तीचं नाव कृष्णानंद पांड्ये असं असल्याची माहिती समोर आली आहे. कृष्णानंद हे 75 वर्षांचे होते. ते सेंट्रल स्टेट कॉलिनीमध्ये वास्तव्यास होते. साखर कारखान्यामधून व्यवस्थापक पदावरुन ते निवृत्त झाले होते. 



बैलाचाही मृत्यू


या बैलाने इतर अनेकांवरही असा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने इतर कोणीही जखमी झालं नाही. या बैलासंदर्भातील माहिती प्रशासनाला दिल्यानंतर बैलाला बेशुद्ध पाडून ताब्यात घेण्यासाठी पालिकेचं पथक या परिसरात दाखल झालं. मात्र या बैलाला पकडण्याच्या प्रयत्नात दोरखंडाचा फास लागून बैल दगावल्याची माहिती समोर आली आहे.