पणजी : सागरपरिक्रमा... शिडाच्या बोटीतून सागरावर स्वार होऊन जगप्रदक्षिणा करायला तो पुन्हा एकदा सज्ज झालाय. या साहसवेड्याचं नाव आहे... कमांडर अभिलाष टॉमी...


काय आहे 'गोल्डन ग्लोब रेस'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माणसाच्या शारीरिक, मानसिक क्षमतांचा कस लावणारी एक अनोखी साहसी स्पर्धा जून २०१८ मध्ये आयोजित करण्यात आलीय. 'गोल्डन ग्लोब रेस' नावाने ओळखली जाणारी ही स्पर्धा जगातील पहिल्या विनाथांबा सागरपरिक्रमा पूर्ण झाल्याच्या घटनेच्या सुवर्ण महोत्सवा निमित्ताने आयोजित करण्यात आली आहे. जगभरातील ३० साहसी दर्यावर्दी यात सहभागी होणार आहेत. याच स्पर्धेसाठी भारतीय नौदलाचे कमांडर अभिलाष टॉमी यासाठी विशेष आमंत्रित स्पर्धक आहेत.


'तुरिया'ची बांधणी...


या स्पर्धेसाठी बांधण्यात आलेल्या 'तुरिया' या खास शिडाच्या बोटीचे सोमवारी गोव्यात जलावतरण करण्यात आलं. या स्पर्धेत सर रॉबिन यांनी १९६८ मध्ये वापरलेल्या शिडाच्या बोटीसारखीच बोट वापरणे बंधनकारक आहे. तसंच नौकानयनासाठी त्यांनी त्याकाळी वापरलेल्या तंत्राचाच वापर करावा लागणार आहे. तसेच केवळ त्या काळात उपलब्ध असणारे नौकानयनाचे तंत्र वापरावे लागणार आहे.


कमांडर अभिलाष टॉमी 

कमांडर अभिलाष यांचा अनुभव


कमांडर अभिलाष टॉमी यांनी २०१२-१३ मध्ये एकही थांबा न घेता १५० दिवसांमध्ये शिडाच्या बोटीतून सागरपरिक्रमा पूर्ण केली होती. परंतु, 'गोल्डन ग्लोब रेस'मध्ये सुमारे ३०० दिवस समुद्रावर राहावं लागणार असून ३० हजार सागरी मैल अंतर कापावं लागणार आहे.


या पूर्वीच्या सागरपरिक्रमेत अत्याधुनिक तंत्राचा (जीपीएस नकाशे, सॅटेलाइट संपर्क यंत्रणा इ.) वापर केला होता. पण या स्पर्धेसाठी फक्त छापील नकाशे, होकायंत्र आणि ग्रह-ताऱ्यांचाच काय तो आधार असणार आहे. संपर्कासाठी केवळ एक HF रेडिओ उपलब्ध असणार आहे. तसेच सर रॉबिन यांच्या बोटीच्या आकारानुसारच बोट वापरायची असल्यामुळे पाण्याच्या साठ्यावर मर्यादा येणार आहे. सर रॉबिन यांनी पावसाचे पाणी साठवून त्याचा वापर केला होता. संपूर्ण परिक्रमेत कोणत्याही प्रकारची बाह्य मदत घेता येणार नाही, असं म्हणत अभिलाष यांनी आपण या स्पर्धेसाठी उत्सुक असल्याचं म्हटलंय.


अभिलाष टॉमी यांच्या यापूर्वीच्या सागरपरिक्रमेत 'म्हादेई' या शिडाच्या बोटीचा वापर करण्यात आला होता. याच 'म्हादेई'वरुन कमांडर दिलीप दोंदे हे चार थांबे घेत सागरपरिक्रमा पूर्ण करणारे पहिले भारतीय ठरले होते. तर अभिलाष यांनी ही परिक्रमा न थांबता पूर्ण केली होती. 'म्हादेई'ची निमिर्ती रत्नाकर दांडेकर यांनी केली होती. तर 'गोल्डन ग्लोब रेस'साठीदेखील त्यांनीच अभिलाष यांच्यासाठी बोट बांधली आहे. कमांडर (निवृत्त) दिलीप दोंदे यांचंही अभिलाष यांना नव्या आव्हानासाठी मार्गदर्शन मिळत आहे.


तीन कोटींची 'तुरिया'...


'गोल्डन ग्लोब रेस'मध्ये भाग घेण्यासाठीची  बांधण्यात आलेल्या बोटीचे नाव ‘तुरिया’ असे  आहे.  सर रॉबिन यांच्या मूळ बोटीप्रमाणेच (मूळ रचनाकार विल्यम एटकिन्स) तुरिया बांधण्यात आली आहे. सर रॉबिन यांची बोट पूर्णपणे लाकडाची होती. १९६८ मध्ये फायबर ग्लासच्या वापराचे तंत्रज्ञान उपलब्ध होते, त्यामुळे तुरियाच्या बांधणीत फायबरचादेखील वापर केला आहे. ३२ फूट लांबीच्या तुरियाचे वजन जवळपास आठ ते नऊ टन इतके आहे. अंतर्गत रचनेत थोडाफार बदल केला आहे, पण मुख्यत: सर रॉबिन यांच्या 'सुहाली' या बोटीची ती प्रतिकृतीच आहे. तुरियाच्या बांधणीसाठी सुमारे तीन कोटी खर्च आला आहे.