नवी दिल्ली : CDS जनरल बिपिन रावत हेलिकॉप्टर क्रॅश प्रकरणात आता मोठी माहिती समोर आली आहे. तपास अहवालात हेलिकॉप्टर नेमकं क्रॅश कसं झालं याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. तपास पथकानं सादर केलेल्या अहवालानुसार हेलिकॉप्टरमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या अहवालानुसार निष्काळजीपणा किंवा कोणत्याही प्रकारची तोडफोड देखील झाली नाही अशी माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार हे हेलिकॉप्टर योग्य मार्गावर होतं. अचानक वातावरणात बदल झाला. त्यामुळे हेलिकॉप्टर ढगांनी वेढलं गेलं. त्यामुळे पायलटचं नियंत्रण सुटलं. 


तो डोंगराळ भाग होता. आजूबाजूला ढगांनी वेढल्यामुळे अंदाज येणं कठीण होतं. बदललेल्या वातावरणामुळे हा अपघात झालाय या अपघातात जनरल रावत यांच्यासह हेलिकॉप्टरमधील 14 जणांचा मृत्यू झाला होता.


नीलगिरी डोंगरावरून हे हेलिकॉप्टर व्यवस्थित जात असल्याची माहिती मिळाली होती. पायलट आणि प्रवासी दोघांनाही अशा प्रकारे काही होईल याची कल्पना नव्हती. त्यानंतर अचानक हवामान प्रचंड वेगाने बदलले आणि हेलिकॉप्टर अचानक कोसळलं. अहवालात कोणतीही मानवी त्रुटी किंवा नेव्हिगेशनची कमतरता असल्याचं नाकारण्यात आलं आहे. 


या हेलिकॉप्टरमधून CDS जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत आणि आर्मी एअरफोर्सचे 12 अधिकारी प्रवास करत होते. 8 डिसेंबर रोजी सुलूर एअरबेसवरून हे हेलिकॉप्टर टेकऑफ झालं होतं. वेलिंगटन एअरबेस पोहोचण्याच्या काही मिनिटं आधी हा अपघात झाला.


हेलिकॉप्टर क्रॅश होण्याआधी निलगिरी डोंगराळ भागात कंट्रोल रूमशी देखील संपर्क तुटला होता. त्यानंतर क्रॅश झाल्याची माहिती समोर आली. हेलिकॉप्टर क्रॅश होण्याआधीचा एक व्हिडीओ देखील समोर आला होता. यामध्ये ते ढगांमध्ये गायब झालेलं देखील व्हिडीओमधून समोर आलं होतं.