CDS Bipin Rawat Death News : सीडीएस बिपिन रावत यांचं `ते` शेवटचं विधान
देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत (CDS Bipin Rawat) हे पाकिस्तानच्या तुलनेत चीनला सर्वात मोठा धोका मानत होते.
नवी दिल्ली : तामिळनाडूमधील हेलिकॉप्टर अपघातात देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत शहीद (CDS Bipin Rawat) झाले. सीडीएस बिपीन रावत पाकिस्तानपेक्षा (Pakistan) चीनला सर्वात मोठा धोका मानत होते. नुकत्याच केलेल्या वक्तव्यात त्यांनी चीनला (China) स्पष्ट शब्दात इशारा दिला होता. 'कोणत्याही गैरप्रकाराला प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत, चीनने पुन्हा गलवानसारखं कृत्य करण्याची हिम्मत केली तर त्यांना त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल, जसं मागच्यावेळी दिलं होतं, असा सज्जड दम CDS बिपीन रावत यांनी दिला होता.
'LAC वर हलगर्जीपणाचा प्रश्नच नाही'
सीमारेषेवर चीनच्या कुरापती सुरुच आहेत. अशा परिस्थितीत LAC च्या कोणत्याही भागात आपली पकड कमी होऊ देणार नाही, असं CDS बिपीन रावत यांनी म्हटलं होतं. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) ने LAC जवळच्या काही भागात पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा केली आहे. अशा परिस्थितीत चीन सीमारेषेजवळच्या भागात हातपाय पसरु शकतो. त्यामुळे सीमारेषेवर हलगर्जीपणाचा प्रश्नच उद्भवत नाही, असं CDS बिपीन रावत यांनी म्हटलं होतं.
'देशाच्या रक्षणासाठी आमचे सैनिक सज्ज'
CDS बिपिन रावत म्हणाले होते की चीन पुन्हा एकदा काही भागांवर कब्जा करण्यासाठी प्रयत्न करु शकतो. पण आमचीही पूर्ण तयारी आहे. मातृभूमीचं रक्षण करण्यासाठी आमचे सैनिकही उंच डोंगरावर ठाम मांडतील.
'शत्रूला चोख प्रत्युत्तर देऊ'
पूर्व लडाखमध्ये लष्कराच्या उपस्थितीबाबत CDS बिपिन रावत यांनी चीनला कडक शब्दात इशारा दिला होता. हिवाळी हंगामातील आव्हानांचा सामना करण्यासाठी तयारी करण्यात आली आहे. सर्व जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्यात आला आहे. शत्रूकडून काही गैरप्रकार झाला, तर त्याला तोंड देण्यासाठी आणि प्रत्युत्तर देण्यासाठी आपल्याकडे पुरेशी संसाधनं आहेत. आम्ही कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही असं CDS बिपिन रावत यांनी स्पष्ट केलं होतं.