पाककडून ४० भारतीय चौक्यांवर फायरिंग, महिलेसह मुलाचा बळी
जम्मू-काश्मीरच्या सीमेवर पाकिस्तानचा आडमुठेपणा अजूनही थांबत नाहीये.
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या सीमेवर पाकिस्तानचा आडमुठेपणा अजूनही थांबत नाहीये. शुक्रवारी पाकिस्तानने आरएसपुरा सेक्टरमध्ये पुन्हा एकदा सीजफायरचं उल्लंघन केलं. शुक्रवारी सकाळी ६.३० वाजता जम्मूच्या आरएसपुरा, अरनिया, रामगढ सेक्टरमध्ये गोळीबार करण्यात आला.
रिपोर्टनुसार, पाकिस्तानने शुक्रवारी भारतीय सेनेच्या ४० चौक्यांवर आणि ५० गावांवर निशाणा साधून फायरिंग केली. पाकिस्तानकडून करण्यात येत असलेल्या फायरिंगमध्ये दोन स्थानिक नागरिकांचा मृत्यु झालाय. त्यात एका महिलेचा आणि एका लहान मुलाचा समावेश आहे.
सेनेचा एक जवान शहीद
बुधवारी रात्री पाकिस्तानी सेनेने सीजफायरचं उल्लंघन करत भारतीय सीमेवर गोळीबार केला होता. आरएसपुरा सेक्टरमध्ये केल्या गेलेल्या या फायरिंगमध्ये सीमा सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाला होता. तर ३ जवान आणि तीन नागरिक जखमी झाले होते. पाकिस्तानच्या या फायरिंगला भारतीय जवानांनी सडेतोड उत्तर दिले होते.
बुधवारी रात्री फायरिंग
बीएसएफच्या एका अधिका-याने सांगितले की, पाकिस्तानने आरएस पुरा सेक्टरमध्ये बुधवारी रात्री साधारण ११ वाजता फायरिंग केली. नंतर भारताकडूनही पाकिस्तानी चौक्यांवर फायरिंग केली गेली होती. यात बीएसएफचा एक जवान शहीद झाला तर तीन जखमी झालेत.