नवी दिल्ली: देशभरातील उच्च शिक्षण संस्था आणि विद्यापीठांमध्ये 'सर्जिकल स्ट्राईक डे' साजरा करण्याच्या आदेशावरून गदारोळ निर्माण झाल्यानंतर केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. हा निर्णय ऐच्छिक आहे. त्यामुळे ज्या महाविद्यालयांना 'सर्जिकल स्ट्राईक डे' साजरा करावासा वाटेल, त्यांनीच तो साजरा करावा. यादिवशी संबंधित महाविद्यालये निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांची व्याख्याने आयोजित करू शकतात. जेणेकरून विद्यार्थ्यांनी भारतीय लष्कराने देशाचे कशाप्रकारे रक्षण केले आहे, याची माहिती मिळेल. तसेच विद्यार्थ्यांना 'सर्जिकल स्ट्राईक' विषयी आणखी जाणून घेता येईल, असे जावडेकर यांनी सांगितले. 


विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी)  देशभरातील विद्यापीठांना २९ सप्टेंबर हा दिवस 'सर्जिकल स्ट्राईक डे' म्हणून साजरा करण्याचे आदेश दिले आहेत. यादिवशी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी भारतीय लष्कराशी कटिबद्ध राहण्याची शपथही द्यावी, असे युजीसीने शिक्षणसंस्थांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. यादिवशी राष्ट्रीय छात्रसेनेच्या विद्यार्थ्यांनी (एनसीसी) विशेष संचलनही करावे, असे युजीसीने म्हटले आहे.