नवी दिल्ली : केंद्र सरकारनं लसीकरण मोहिमेसाठी खास नियमावली जारी केली आहे. दर दिवशी १०० ते २०० जणांना लस टोचण्यात येणार आहे. लस दिलेल्यांना जवळपास ३० मिनिटं निरिक्षणाखाली ठेवण्यात येईल अशा काही सूचना सरकारनं जारी केल्या आहेत. राज्य सरकारला दिलेल्या निर्देशांनुसार को-विन या अॅपवर नोंदणी केलेल्यांनाच लसीसाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्य सरकारांनी लसीकरणाची मोहिम परिणामकारकपणे राबवण्यासाठी जनजागृती करावी असेही निर्देश देण्यात आले आहेत. तसंच या लसींची वाहतूक आणि वापराबाबतही केंद्राने काही सूचना केल्या आहेत. आणि अर्थातच सर्वात प्रथम कोरोना योद्धे आणि ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात येतील असंही या नियमावलीत स्पष्ट करण्यात आलं आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात 30 कोटी नागरिकांना लस देण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आलं आहे.


आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी लसीकरण केंद्र राखून ठेवली जाणार आहे. त्यामुळे त्यांना लवकर लस मिळू शकेल. लसीकरण केंद्रांवर एका सत्रात १०० जणांना लस दिली जाणार आहे. परंतु जागा आणि इतर गोष्टींच्या उपलब्धतेनुसार ती २०० पर्यंत करता येऊ शकते. एका केंद्रावर एक मुख्य अधिकारी आणि ४ लसीकरण अधिकारी तैनात राहणार आहेत. लसीकरण केंद्रावर प्रतिक्षा कक्ष, लसीकरण कक्ष आणि निरीक्षण कक्ष, अशा तीन खोल्या असतील.