नवी दिल्ली : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, आज (१५ जुलै) पिकविमा भरण्याची शेवटची तारीख होती, तरी देखील ८० टक्के शेतकऱ्यांनी आपला पिकविमा ऑनलाईन भरलेला नव्हता. ही अडचण लक्षात घेऊन राज्याचे कृषिमंत्री दादाराव भुसे, तसेच रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पिकविमा ऑनलाईन भरण्याची मुदतवाढ देण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली होती. या मागणीला केंद्राकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला आहे. अखेर या वर्षी पिकविमा भरण्यासाठी म्हणजेच पिकविमा काढण्यासाठी २३ जुलै २०२१ पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर दुसरीकडे बँकांचे सर्वर काम नीट करत नव्हते, शेतकरी बँकासमोर रांगा लावून होते. यानंतर शेतकऱ्यांनी मला फोन केले आणि मी केंद्रीय कृषिमंत्री तोमर यांच्याकडे ही व्यथा मांडली आणि त्यांनी अखेर ही मुदत वाढ दिली असं रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.


पिकविमा ऑनलाईन भरण्यासाठी ८ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. अनेक ठिकाणी पाऊस आणि इंटरनेट स्पीड यामुळे ऑनलाईन पिकविमा भरण्यास अडचणी येत होत्या. या अडचणी लक्षात घेऊन केंद्र सरकारने मुदतवाढ दिली आहे.