नवी दिल्ली : दक्षिण आफ्रीकेत आलेल्या ओमायक्रॉन (Omicron) या नव्या व्हेरीयंटचे नवे रूग्ण भारतात सापडल्याने चिंता वाढली आहे. देशात पुन्हा एकदा कडक निर्बंधांची शक्यता आहे. तर, देशात तातडीने लॉकडाऊनची गरज नसल्याचं स्पष्टीकरण केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलं. ओमायक्रॉनचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सक्षम असल्याचं आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya) यांनी आज लोकसभेत (Lok Sabha) डेटा सादर केला. याद्वारे त्यानी कोरोनाव्हायरस साथीच्या आजारादरम्यान उचललेल्या उपाययोजनांची माहिती दिली. याशिवाय मांडविया यांनी देशातील आरोग्य क्षेत्रात निर्माण केलेल्या पायाभूत सुविधांची माहिती सभागृहाला दिली. कोरोना महामारीच्या काळात सरकारने निष्काळजीपणा दाखवल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. यावर उत्तर देताना केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी ही माहिती दिली.


आरोग्य मंत्री मांडविया म्हणाले की, भारतात 3.46 कोटी कोविड-19 प्रकरणं नोंदवली गेली आहेत, तर 4.6 लाख लोकांनी या धोकादायक विषाणूमुळे आपला जीव गमावला आहे. कोरोनाच्या एकुण प्रकरणांपैकी मृत्यूची संख्या 1.36 टक्के आहे. ते म्हणाले की, भारतात प्रति 10 लाख लोकसंख्येमागे 5,000 प्रकरणे आणि 340 मृत्यूची नोंद झाली आहे. जगातील ही सर्वात कमी आकडेवारी आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये कमकुवत आरोग्य पायाभूत सुविधा मजबूत करण्याचं काम सुरू आहे, आरोग्याच्या पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल मागील सरकारांना दोष न देता, आताच्या सरकारने चांगले परिणाम मिळवण्यासाठी काम केलं असल्याचं मांडविया म्हणाले.


ओमायक्रॉनबद्दल बोलताना केंद्रीय आरोग्य मंत्री मांडविया यांनी महत्त्वाची माहिती दिली. ओमायक्रॉनचा जीनोम सिक्वेंसिंगचा रिपोर्ट आता 30 तासात मिळणं शक्य होणार आहे. 50 हजार वेंटिलेटर्स राज्यांना दिली आहेत. मदतीवरुन कोणीही राजकारण करु नये.  मोदी सरकारने पॉवरने नाही तर विल पॉवरने काम केलंय, अशी स्तुतीही त्यांनी केली.  


तसंच लहान मुलांचं लसीकरण आणि बुस्टर डोस देण्याबाबत वैज्ञानिक टास्क फोर्सच्या सूचनेनुसार निर्णय घेतला जाईल असंही मांडविया यांनी म्हटलं आहे.