`एक गोली, एक दुश्मन`; पाहा भारतीय लष्कराचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ
है तय्यार हम!
श्रीनगर : कित्येक दिवसांपासून India भारत आणि China चीन या दोन्ही राष्ट्रांमध्ये सीमा वादावरुन बरेच खटके उडत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरही या मुद्यानं अनेक राष्ट्रांचं लक्ष वेधलं आहे. परस्पर सामंजस्यानं हा प्रश्न सोडवण्यासाठी एकिकडे पावलं उचलली जात असतानाच दुसरीकडे चीनच्या सीमेनजीक सैन्याच्या हाचलाचील दिसू लागल्याचंही वृत्त समोर येत आहे.
किंबहुना चीनच्या सैन्याशी संबंधित एक व्हिडिओसुद्धा सोशल मीडायवर बराच चर्चेत आला. ज्यामध्ये भारताला आव्हान देण्याचा त्यांचा मनसुबा काही लपून राहिलेला नाही. याच व्हिडिओचं प्रत्युत्तर म्हणा किंवा मग भारतीय लष्कराची एकंदर ताकद किती आहे, याची प्रचिती देण्यासाठी म्हणा केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी ट्विटरच्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर केला.
Ladakh लडाखच्या सीमा भागात गस्त घालत देशाच्या संरक्षणार्थ सज्ज अणाऱ्या या शूरवीरांची आणि लढवैय्यांची झलक पाहून खऱ्या अर्थानं अंगावर काटा येत आहे. बंदुकीच्या निशाण्यावर असणाऱ्या शत्रूपासून ते अगदी दूरवर लपून बसलेल्या आणि देशावर वाईट नजर असणाऱ्या शत्रूपर्यंत प्रत्येकालाच हाणून पाडण्यासाठी लष्कर शक्य त्या सर्व मार्गांनी सज्ज असल्याचं या व्हिडिओतून स्पष्ट होत आहे.
वाचा : चीनकडून भारताच्या सीमेजवळ हजारो सैनिक आणि रणगाडे तैनात
ट्विटरवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये शस्त्रास्त्रांसोबतच अद्वितीय आत्मविश्वास असणाऱ्या सैनिकांची जिद्द आणि देशाप्रती असणारी त्यांची एकनिष्ठ वृत्तीही दिसत आहे. भारतीय लष्करातील तिन्ही तुकड्या वेळ पडल्यास चीनचं प्रत्येक आव्हान परतवून लावतील अशी हमी हा व्हिडिओ देत आहे. अवघ्या जवळपास दोन मिनिटांच्या या व्हिडिओमधील सैन्याची तयारी आणि त्यांचं साहस पाहता, चीनपुढे 'है तय्यार हम....!' असंच म्हणत ही भारतीय सेना गरज भासल्यास उभी ठाकेल हे खरं.