नवी दिल्ली: 'जमावाकडून होणाऱ्या हत्या रोखण्यासाठी केंद्र सरकार लवकरच फाशीच्या शिक्षेची तरतूद असणारे विधेयक आणणार आहे', अशी महत्त्वपूर्ण माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिलीय. यवतमाळ येथे नाथजोगी समाजाच्या प्रतिनिधींशी बोलताना अहीर यांनी ही माहिती दिली. काही दिवसांपूर्वी मुले पळवण्याच्या संशयावरून धुळ्यात नाथजोगी समाजाच्या ५ जणांची जमावाने हत्या केली होती. त्या पार्श्वभूमीवर नाथजोगी समाजाच्या प्रतिनिधींनी आपल्या मागण्यांसाठी केंद्रीय गृह राज्यमंत्री अहीर यांची भेट घेतली. 


पोलिसांची बारीक नजर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, सोशल मीडियावरून अफवा पसरवणाऱ्यांना आता मोठा दणका मिळणार आहे. ज्या ग्रुपवर अफवांचा पाऊस पडत असतो अशा ग्रुपवर पोलिस करडी नजर ठेऊन आहेत. पोलिसांना त्यांच्या त्यांच्या परिसरातल्या व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन करून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आलंय. अफवा पसरवून कोणाला मारहाण करण्याचा आसुरी आनंद घ्यायचा तुमचा इरादा असेल तर आता तुमची खैर नाही. थेट पोलिसांशी तुमची गाठ असणार आहे. तुमच्या परिसरातले पोलीस आता तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर असणार आहेत. ग्रुपमधल्या संभाषणांवर पोलिसांची नजर असेल.


..तर पोलिसांचा हस्तक्षेप


मुले पळवणारी टोळी  समजून मारहाण होण्याच्या घटना जागोजागी घडत आहेत. या अफवांनी आत्तापर्यंत तब्बल ८ बळी घेतलेत. धुळ्यात तर एकाचवेळी पाच जणांचा बळी गेलाय. भविष्यात या घटना टाळण्यासाठी पोलिसांनी ही शक्कल लढवली आहे. पोलीस शिपायापासून ते अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनाच या आदेशाने कामाला लावलंय. मात्र आता बेजबाबदारपणे व्हॉट्सअप वापरणाऱ्यांनो तुमची मजा कोणाच्या जीवावर उठत असेल तर पोलिसांना यात हस्तक्षेप करावाच लागेल.