पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याचा उपाय सापडलाय - अमित शहा
या सगळ्याला अमेरिका व चीनमधील व्यापारयुद्ध कारणीभूत आहे.
नवी दिल्ली: अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्धामुळे इंधनाचे दर वाढले आहेत. केंद्र सरकार यावर लवकरच यावर तोडगा काढले, असे आश्वासन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिले. ते शनिवारी हैदराबाद येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी त्यांनी म्हटले की, आंतरराष्ट्रीय स्तरावरील काही घडामोडींमुळे इंधनाचे दर वाढणे आणि रुपयाचे अवमूल्यन होत आहे. या सगळ्याला अमेरिका व चीनमधील व्यापारयुद्ध कारणीभूत आहे. मात्र, आता आम्हाला यावर तोडगा सापडला आहे. लवकरच ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकार योग्य ती पावले उचलेल, असे अमित शहा यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी इंधन दरवाढीवरून काँग्रेसने भारत बंद आंदोलन केले होते. या आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. मात्र, त्यानंतरही केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील कर तातडीने कमी करायचे टाळले होते. त्याऐवजी केंद्राने सर्व राज्यांना स्थानिक पातळीवर उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते.