नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ब्राझील येथे होत असलेल्या ब्रिक्स परिषदेसाठी आज रवाना होणार आहेत. पण त्याआधी पंतप्रधान मोदींनी केंद्रीय मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालांनी राष्ट्रपती शासनाची शिफारस केल्याचं डीडी न्यूजने म्हटलं आहे. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक सुरु आहे. त्यामुळे महाराष्ट्राबाबत या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांच्या माहितीनुसार, मोदी कॅबिनेट महाराष्ट्रात राष्ट्रपती शासन लागू करण्याबाबत निर्णय घेईल, त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना हा प्रस्ताव पाठवण्यात येईल. याबाबत महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी कायद्यानुसार माहिती घेतली.


पंतप्रधान मोदी हे परदेश दौऱ्यावर जात असल्याने केंद्रीय मंत्री मंडळाची आधीच याबाबत चर्चा केल्याची ही शक्यता आहे. राष्ट्रवादीला आज संध्याकाळीपर्यंत सरकारस्थापनेसाठी मुदत आहे. पण जर राष्ट्रवादी बहुमताचा आकडा गाठू शकली नाही. तर केंद्र सरकार पुढील पाऊल उचलेल अशी शक्यता आहे.



महाराष्ट्राचे राज्यपाल राज्यात जर राष्ट्रपती शासन लागू करतात तर शिवसेना सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं म्हटलं जातं आहे. उद्धव ठाकरे यांनी याबाबत काँग्रेस नेते आणि वरिष्ठ वकील कपिल सिब्बल आणि अहमद पटेल यांच्यासोबत चर्चा केली असल्याचं देखील म्हटलं जातं आहे.