G20 Summit : जूननंतर भारताला मंदीचा (Recession in India) फटका बसण्याची शक्यता आहे असे केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी सोमवारी म्हटले आहे. मात्र केंद्र सरकार हे प्रभावीपणे हाताळण्यासाठी आणि देशावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी काम करत असल्याचेही नारायण राणे म्हणाले. पुण्यात (Pune) सुरु असलेल्या जी-20 परिषदेत बोलताना नारायण राणे यांनी हे विधान केले आहे. भारतासह ऑस्ट्रेलिया आणि ब्राझिल यांच्यातर्फे या परिषदेचे आयोजन करण्यात आले असून सोमवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते परिषदेचे उद्धाटन करण्यात आले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्घाटानंतर पत्रकार परिषदेत बोलत असताना नारायण राणे यांना भारताला आर्थिक मंदीचा फटका बसू शकतो असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना नारायण राणे यांनी, जागतिक मंदी अनेक देशांमध्ये आहे. केंद्र सरकारच्या बैठकांमध्ये झालेल्या चर्चेतून मला हेच जमले आहे. जूननंतर मंदीचा फटका भारताला बसण्याची शक्यता आहे, असे म्हटले.


आर्थिक मंदीचा मोठ्या देशांनाही फटका


"जी 20 या जागतिक परिषदेचे उदघाटन माझ्या हाताने झाल्याबद्दल मी स्वतःला भाग्यशाली समजतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे यासाठी आभार मानतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आपण देशात प्रगती करत आहोत. आपल्या जीडीपीमध्ये कमालीची वाढ होत असून आठ वर्षापूर्वी आपला देश दहाव्या क्रमांकावर होता. पण आता आपला देश पाचव्या क्रमांकावर आहे. हे फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणामुळे शक्य झाले आहे. पुढच्या 10 वर्षांत आपण तिसर्‍या क्रमांकावर जाऊ. जगामध्ये आर्थिक मंदीचा मोठ्या देशांनाही फटका बसत आहे. भारतातही मंदी आली तर जूननंतर येईल. मंदीची झळ सामान्य नागरिकांना पोहचू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्न करत आहेत, असे नारायण राणे म्हणाले.


यावेळी बोलताना नारायण राणे यांनी शिदे - फडणवीस सरकारचे कौतुक करताना सरकार बदलले म्हणून उद्योग बाहेर जात नाहीत असे म्हटले. "महाराष्ट्राच्या प्रशासनाबद्दल मला अभिमान आहे. सगळे विषय कॅबिनेटमध्ये येतात. आपल्या नेत्यांच्या बुद्धिमत्ता कमी लेखणे चुकीचे आहे. सरकार बदललं म्हणून निर्णय बदलतात असं नाही. एखादा निर्णय पोषक नसेल तर तो बदलला जातो. सरकार बदललं की दृष्टिकोन बदलतो. सरकार बदलले म्हणून उद्योग बाहेर गेले असे होत नाही, असेही नारायण राणे म्हणाले.