साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची पक्षातूनही हक्कालपट्टी होण्याची शक्यता?
खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना वादग्रस्त वक्तव्य भोवलं...
मुंबई : खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना वादग्रस्त वक्तव्य भोवलं आहे. प्रज्ञासिंह ठाकूर यांची संरक्षण समितीवरून हकालपट्टी करण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांनी प्रज्ञासिंह यांचं वक्तव्य निषेधार्ह असून भाजप त्याचं समर्थन करत नसल्याचं म्हटलं आहे. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला देशभक्त म्हटलं होतं. त्यावरून वाद निर्माण झाला आहे. साध्वींच्या या वक्तव्यावर विरोधकांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे.
महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नाथूराम गोडसेंना देशभक्त म्हणणं भाजप खासदार साध्वी प्रज्ञा ठाकुर यांना चांगलंच महागात पडलं आहे. संसदीय कार्यमंत्री प्रह्लाद जोशी यांनी साध्वी प्रज्ञा यांना पक्षाच्या बैठकीत येण्यासही मनाई करण्यात आली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, साध्वी प्रज्ञा यांच्या विरोधात पक्षाची अनुशासन समिती मोठी कारवाई करण्याची शक्यता आहे. त्यांना पक्षातून बाहेर केलं जावू शकतं.
काय आहे प्रकरण?
लोकसभेत एसपीजी सुधारणा विधेयकावर चर्चा सुरु असताना डीएमकेचे खासदार ए. राजा यांनी गोडसेचं उदाहरण देत त्यांनी महात्मा गांधींची हत्या केली असं सांगत असताना साध्वी यांनी त्यांना तुम्ही एका देशभक्ताचं उदाहरण नाही देऊ शकत असं म्हटलं होतं.
साध्वी प्रज्ञाच्या विधानावर विरोधकांनी त्यांचावर हल्लाबोल केला. प्रियंका गांधी वाड्रा यांनी देखील ट्विट करत पंतप्रधानांपुढे प्रश्न उपस्थित केले.
निवडणुकीच्या दरम्यान ही नाथूराम गोडसेला देशभक्त म्हटल्यामुळे पंतप्रधान मोदींनी यावर नाराजी दर्शवली होती. साध्वी प्रज्ञा यांनी तेव्हा माफी मागितली होती. पण पंतप्रधान मोदींनी त्यांना मनातून कधीच माफ नाही करु शकत असं म्हटलं होतं.