व्हिडिओ : चंडीगडमध्ये गॅसच्या फुग्यांचा विस्फोट, १५ जखमी
चंडीगडमध्ये एका कार्यक्रमात गॅसचे फुगे फुटल्याने १५ जण जखमी झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
चंडीगड : चंडीगडमध्ये एका कार्यक्रमात गॅसचे फुगे फुटल्याने १५ जण जखमी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. रविवारी सेक्टर ३४ मधील मैदानमध्ये एलन या एका खाजगी प्रशिक्षण संस्थेचा 'भक्ती की पाठशाळा' कार्यक्रम होत होता. सुदैवाने यात कोणती जिवीतहानी झाली नाही. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलीसांनी याप्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
येथे सजावटीसाठी ज्वालशील नायट्रोजन गॅसचे फुगे आकाशात सोडण्यात येत होते. आकाशात जाताना हे फुगे बल्बच्या झालरीत अडकल्याने त्यातून स्पार्क निर्माण झाला व त्याचा विस्फोट झाला. या अपघातात १५ जण जखमी झाले असून त्यांना सेक्टर ३२ येथील जीएमसीएच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी उपस्थित होते. लोकांच्या गळा, हात आणि पायाला किरकोळ जखमा झाल्या आहेत. सुदैवाने यामध्ये कोणालाही गंभीर जखम झाली नाही. प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की या कार्यक्रमाच्या आधी अग्निशामक ना हरकत प्रमाणपत्र घेण्यात आले नव्हते. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला.