नवी दिल्ली : चंदीगड बलात्कार प्रकरणात स्थानिक भाजप खासदार किरण खेर यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किरण खेर यांनी एका पत्रकार परिषदेत या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांना शाबासकी दिलीच परंतु, सोबतच पीडितेलाही एक सल्ला देऊन टाकला. 


'जेव्हा तुम्हाला माहीत आहे की रिक्षामध्ये तीन मुलं बसलेली आहेत तेव्हा तुम्ही त्या रिक्षात बसायलाच नको होतं' असं किरण खेर यांनी म्हटलंय. मी सगळ्या मुलींना सांगू इच्छिते की जेव्हा अगोदरच तीन पुरुष रिक्षात आहेत तेव्हा तुम्ही त्यात चढू नये...' असं त्यांनी म्हटलंय. 


आपलं उदाहरण देत किरण खेर म्हणाल्या, 'जेव्हा आम्हीही मुंबईत कधी टॅक्सी किंवा रिक्षा घेत होतो तेव्हा आम्हाला सोडायला येणाऱ्या व्यक्तीकडे टॅक्सी-रिक्षाचा नंबर देत होतो. असं मी यासाठी करत होते कारण मला माझ्या सुरक्षेची काळजी होती... आपल्याला या काळात या गोष्टींविषयी सतर्क राहावं लागेल'.




किरण खेर यांच्या या वक्तव्यावर चंदीगडचे काँग्रेसचे माजी खासदार पवन कुमार बन्सल यांनी टीका केलीय. 'मी हैराण आहे... त्या असं कसं म्हणू शकतात. चंदीगड महिलांसाठी एक सुरक्षित ठिकाण बनवण्याऐवजी स्थानिक खासदारच अशी वक्तव्य करत आहेत' असं त्यांनी म्हटलंय. 



आपल्या वक्तव्यावर वाद वाढताना पाहून किरण खेर पुन्हा समोर आल्या. बन्सल यांच्यावर निशाणा साधत 'या मुद्याचं राजकारण करणाऱ्यांचा धिक्कार... तुमच्याही घरात मुली आहेत. तुम्हालाही माझ्याप्रमाणे कन्स्ट्रक्टिव्ह गोष्टी करायला हव्यात डिस्ट्रिक्टिव्ह नाही' असं त्यांनी म्हटलं.


काय आहे प्रकरण


२० नोव्हेंबर रोजी पंजाबच्या मोहालीमध्ये पीजीमध्ये राहणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणीनं घरी जाण्यासाठी चंदीगडहून रिक्षा घेतली होती. या दरम्यान दोन इतर लोकही रिक्षामध्ये बसलेले होते... ते प्रवासी असल्याचं तरुणीला वाटलं. थोडं दूर गेल्यानंतर रिक्षा ड्रायव्हरनं सेक्टर ५३ च्या स्लिप रोडवर रिक्षा खराब झाल्याचं नाटक केलं. तरुणीनं रिक्षावाल्याला पैसे देऊन तिथून काढता पाय घेण्याचा प्रयत्न करताच इतर दोघांनी तिचं तोंड दाबलं... आणि बाजुच्याच झुडूपात तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. 


चंदीगड पोलिसांनी या प्रकरणातील तीनही आरोपींना अटक करून २९ नोव्हेंबर रोजी कोर्टासमोर हजर केलं. आरोपींना दोन दिवसांच्या पोलीस रिमांडवर धाडण्यात आलंय. आता या प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी १ डिसेंबर रोजी होणार आहे.