चंद्राबाबू नायडू यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा
वायएसआर काँग्रेस विधानसभा जागांवर आघाडीवर
नवी दिल्ली : आंध्रप्रदेशमध्ये ११ एप्रिल रोजी विधानसभेसाठी मतदान घेण्यात आले. आंध्रप्रदेशच्या 175 विधानसभा जागांसाठी आज सुरु असलेल्या मतमोजणीत मोठी आश्चर्यकारक आकडेवारी समोर येत आहे. 2004 मध्ये बाजी मारलेल्या चंद्राबाबू नायडू यांना यंदाच्या निवडणूकीत धक्का बसला आहे. वायएसआर काँग्रेसचे जगनमोहन रेड्डी यांनी आघाडी घेतली असून सरकार स्थापनेच्या अगदी जवळ पोहचल्याचे निश्चित झाले. लोकसभा निवडणूकीत चंद्राबाबू नायडू यांना मिळालेल्या धक्क्यानंतर त्यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. राज्यपाल यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सोपवला आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, वायएसआर काँग्रेसचे 152 जागांवर आघाडी घेतली आहे. तर तेलुगू देसम पार्टी 27 जागांवर पुढे आहे. अभिनेता पवन कल्याण यांचा पक्ष जन सेना केवळ एका विधानसभा जागेवर पुढे आहे. सुरुवातीच्या आलेल्या कलनंतर, टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी ते मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले होते. अखेर त्यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे.
राजीनामा दिल्यानंतर चंद्राबाबू नायडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन केले आहे. तसेच वायएसआर काँग्रेसचे जगनमोहन रेड्डी यांनादेखील शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी टीडीपी पक्ष कार्यकर्त्यांचे आभार मानले असून जनतेचेही आभार मानले आहेत.
आंध्रप्रदेश विधानसभा निवडणूकीच्या मतदान मतमोजणीला सुरुवात झाल्यापासूनच जगनमोहन रेड्डी आघाडीवर आहेत. वायएसआर विधानसभा जागांवर आघाडीवर असून सत्तारुढ तेलुगू देसम पार्टी पिछाडीवर आहे. या निवडणूकीमध्ये तेलुगू देसम पार्टीच्या मतांमध्ये जवळपास 6 टक्क्यांची कमी झाली असून वायएसआर काँग्रेसच्या मतांमध्ये 5.7 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याचा फायदा पक्षाला झाल्याचे समोर आले आहे.