बंगळुरू : चांद्रयान-2 हे त्याच्या दुसऱ्या कक्षेत पुढे गेले असून ते चंद्राच्या आणखी जवळ पोहोचल्याची माहीती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) दिली आहे. रात्री साधारण एक वाजून आठ मिनिटांनी यानाने दुसऱ्या कक्षेत प्रवेश केला. यासाठी प्रणोदन यंत्रणेचा वापर झाला असून त्याला 15 मिनिटांचा वेळ लागला. या यानाने प्रयत्नानंतर 251 X 54,829 किमी च्या कक्षेत प्रवेश केला. चांद्रयानाच्या सर्व गतिविधी या व्यवस्थित असल्याचेही सांगण्यात आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


चांद्रयान-2 हे 29 जुलैला दुपारी तिसऱ्या कक्षेत प्रवेश करेल. एक मून लॅंडर आणि रोवरच्या मदतीने चंद्रावर आंतराळ यान पाठविण्याच्या योजनेला 22 जुलैला प्रत्यक्षात सुरुवात झाली. संपूर्ण भारतीय बनावटीच्या जीएसएलव्ही एम के ३ या प्रक्षेपकानं उड्डाणानंतर बरोबर १५ मिनिटांनी चांद्रयानाला त्याच्या नियोजित कक्षेत नेऊन सोडलं आणि नियंत्रणकक्षातल्या शास्त्रज्ञ-तंत्रज्ञांच्या ताणलेल्या चेहऱ्यांवर पहिलं हास्य उमटलं. अवकाशात झेपावलेलं हे चांद्रयान सुमारे ४८ दिवसांत चंद्रावर पोहोचणार आहे. ६ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर दरम्यान चांद्रयान चंद्रावर पोहोचेल, असा अंदाज आहे. पुढचे काही दिवस या चांद्रयानासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत.


यशस्वी उड्डाण 


भारताची अत्यंत महत्वाकांक्षी मोहीम असलेलं चांद्रयान २ यशस्वीरित्या अवकाशात झेपावलं. श्रीहरिकोटामधल्या इस्रोमधून दुपारी २.४३ च्या सुमाराला चांद्रयान चंद्राच्या दिशेनं झेपावलं. सुवर्णाक्षरांनी या क्षणाची नोंद इतिहासात झाली. तब्बल २५ वर्षं या मोहिमेवर काम सुरू होतं. अपेक्षेपेक्षा उत्तम कामगिरी घडल्याचं इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी सांगितलं. हा क्षण याचि देही याची डोळा अनुभवण्यासाठी इस्रोमध्ये अनेक लोकांनी गर्दी केली होती.