अमित जोशी, झी मिडिया, मुंबई : साऱ्या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या चांद्रयान -2 मोहिमेतील एका टप्प्यावर आज पहाटे एका अपयशाचा सामना इस्त्रोला करावा लगाला. चंद्रावर अलगद उतरणाऱ्या विक्रम लँडरचा संपर्क शेवटच्या काही सेकंदात तुटल्याचं इस्त्रोने जाहीरं केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज पहाटे चंद्रावर अलगद उतरु पहाणाऱ्या 'विक्रम' लँडरच्या वाटचालीकडे संपुर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेले होते. हा क्षण अनुभवण्यासाठी इस्त्रोच्या बंगळूरु इथल्या नियंत्रण कक्षात स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जातीने उपस्थित राहीले होते. तर देशांत अनेक ठिकाणी उत्साही नागरिकांनी जागरणही केले होते. 



चंद्राच्या पृष्ठभापासून 35 किलोमीटर उंचीवर असतांना रात्री एक वाजून 37 मिनिटांनी विक्रम लँडरने चंद्रावर स्वयंचलित पद्धतीने उतरायला सुरुवात केली. उतरण्याच्या सुरुवातीला एक हजार 640 मीटर प्रति सेकंद असा विक्रम लँडरचा वेग होता. टप्प्याटप्प्याने हा वेग कमी करत विक्रम लँडर चंद्राच्या जमिनीच्या दिशेने मार्गक्रमण करत होता. 


साधारण एक वाजून 52 मिनीटांनी विक्रम लँडर चंद्रावर अलगद उतरणे नियोजित होते. जो मार्ग आणि दिशा ठरवून देण्यात आली होती त्या मार्गानेच विक्रम लँडरची वाटचाल सुरुही होती. 



मात्र चंद्राच्या जमिनीपासून 2 किलोमीटर 100 मीटर उंचीवर असतांना बंगळुरु इथल्या नियंत्रण कक्षाशी विक्रम लँडरचा असलेला संपर्क हा तुटला. तेव्हाच गेले काही मिनिटे उल्हासित असलेल्या इस्त्रोच्या शास्त्रज्ञांच्या चेहऱ्यावरील हास्य गायब झाले आणि या मोहिमेत काहीतरी गडबड झाली असल्याचं स्पष्ट झालं.


काही प्रयत्न केल्यानंतरही विक्रम लँडरशी संपर्क होत नसल्याचं स्पष्ट झाल्यावर इस्त्रोचे अध्यक्ष डॉ के सीवन यांनी नियंत्रण कक्षातील जागा सोडली आणि पंतप्रधान यांना या मोहिमेत काही गडबड झाल्याची माहिती दिली. ही माहिती देतांना इस्त्रोचे अध्यक्ष भावूक झाले होते. तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या इस्त्रोच्या माजी अध्यक्षांनी सीवन यांना धीर देत आत्तापर्यंतच्या चांद्रयान 2 मोहिमेच्या वाटचालीबद्दल कौतुक केले. मग सीवन यांनी मोहिमेत काही गडबड झाल्याचं उपस्थितांसह देशासमोर स्पष्ट केलं.
मग पंतप्रधानांनी मोदी यांनी नियंत्रण कक्षात असलेल्या शास्त्रज्ञांसमोर जात त्यांना धीर दिला. शास्त्रज्ञांचा देशाला अभिमान असल्याचं सांगितलं.



विक्रम लँडर जरी चंद्रावर अलगद उतरण्यात अपयशी ठरला असला तरी चंद्राभोवती फिरणारे ऑर्बिटर अजुनही व्यवस्थित काम करत आहे. ऑर्बिटर आणि विक्रम लँडरच्या उपलब्ध माहितीच्या आधारे लवकरच अधिकची माहिती समोर येईल. तेव्हा चांद्रयान -2 मोहिमेतील एक टप्पा अयशस्वी ठरला असला तरी ऑर्बिटरमुळे चांद्रयान - 2 मोहीम ही पुढील किमान एक वर्ष सुरुच रहाणार आहे. या मोहिमेत आतापर्यंत केलेल्या वाटचालीबद्दल इस्त्रोचा देशाला अभिमान आहे.