Sleep Mode वर गेलेल्या चांद्रयान 3 ला पुन्हा जाग येणार की नाही? ISRO चा मोठा खुलासा
चांद्रयान 3 च्या विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर आज जागे होणार नाहीत. इस्रोच्या अहमदाबाद येथील Space Application Center चे संचालक निलेश देसाई यांनी ही माहिती दिली आहे.
चांद्रयान 3 मधील विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर सध्या विश्रांती घेत असून, त्यांना पुन्हा रिलाँच म्हणजेच जागं कधी केलं जाणार याबद्दल सर्वांना उत्सुकता आहे. दरम्यान, विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर आज म्हणजेच 22 सप्टेंबरला जागे होणार नाहीत हे स्पष्ट झालं आहे. अहमदाबाद येथील स्पेस अॅप्लिकेशन सेंटरचे संचालक निलेश देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, चांद्रयान 3 म्हणजेच लँडर आणि रोव्हरला उद्या 23 सप्टेंबरला पुन्हा एकदा जागं करण्याचा प्रयत्न केला जाईल. सध्या विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर कार्यरत नाही आहेत.
चंद्रावर आता सकाळ झाली आहे. प्रकाशही पूर्णपणे मिळत आहे. पण चांद्रयान 3 च्या विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरला अद्यापही गरज हवी तितकी ऊर्जा मिळत नाही आहे. चांद्रयान 3 मुळे अनेक नवी माहिती हाती लागली आहे. वैज्ञानिक या सर्व माहितीचा अभ्यास करत आहेत. गेल्या दहा दिवसांतील सर्व डेटा पडताळला जात आहे. यादरम्यान प्रज्ञान रोव्हरने 150 मीटरपर्यंत हालचाल केली आहे.
प्रज्ञान रोव्हरमधून मिळालेल्या डेटाचाही अभ्यास केला जात आहे. चंद्रावरील जमिनीचं विश्लेषण केलं जात आहे. जेणेकरुन पाण्याची स्थिती, मानवी जीवनाची शक्यता याची माहिती मिळावी. 14 दिवस चंद्राच्या पृष्ठभागावरुन वेगवेगळी माहिती पाठवल्यानंतर चांद्रयान 3 स्लीप मोडवर गेलं होतं. त्यावेळी चंद्रावरील दक्षिण ध्रुवावर तापमान उणे 120 ते 220 डिग्री सेल्सिअस होतं. यामुळे यंत्रांमध्ये बिघाड होण्याची शक्यता असते.
या तापमानाचा विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरवर किती परिणाम झाला याची माहिती चांद्रयान 3 पुन्हा जागं झाल्यानंतरच समजू शकणार आहे. याआधी आज अलसुबह यूरोपियन स्पेस एजेंसी (ESA) च्या कोरोऊ स्पेस स्टेशनमधून चांद्रयान 3 च्या लँडर विक्रमला सतत मेसेज पाठवले जात होते. पण लँडरकडून अपेक्षित प्रतिक्रिया मिळत नाही आहे. म्हणजेच अद्यापही रेडिओ फ्रिक्वेन्सी हवी तितकी मजबूत नाही. खगोलशास्त्रज्ञ स्कॉट टिली यांनी हा दावा केला आहे.
स्कॉटने ट्विटमध्ये लिहिले आहे की, वाईट बातमी, चांद्रयान-3 चॅनेलवर 2268 मेगाहर्ट्झ उत्सर्जित होत आहे. हा एक कमकुवत बँड आहे. याचा अर्थ चांद्रयान-3 च्या लँडरकडून अद्याप मजबूत सिग्नल मिळालेला नाही.
याआधी स्कॉटने ट्विट केले होते की, कोरोऊ संपर्कात आले असून त्याच्या योग्य फ्रिक्वेन्सीवर संदेश पाठवत आहे. चांद्रयानचा सिग्नल सतत चालू, बंद होत आहे. चंद्रावरून येणारे सिग्नल कधीकधी स्थिर असतात. हा सिग्नल कधीतरी फार चांगला असतो तर कधीतरी फारच वाईट असतो. विक्रम लँडरचा ट्रान्सपॉन्डर आरएक्स फ्रिक्वेन्सीचा आहे. ते 240/221 च्या फ्रिक्वेन्सीवर ऑपरेट केले पाहिजे. पण तो 2268 MHz चे सिग्नल देत आहे. जो अजिबात स्थिर नाही.
सध्या, युरोपियन स्पेस एजन्सी आणि इस्रो या दोघांनीही चांद्रयान-३ चे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर जागे झाले आहेत की नाही याची पुष्टी केलेली नाही. दरम्यान, शिवशक्ती पॉईंटवर विक्रम लँडर असलेल्या ठिकाणी सूर्यप्रकाश पोहोचला आहे.