Chandrayaan 3 च्या लँडिंगचा प्रत्येक क्षण Live पाहता येणार; कधी आणि कुठे? जाणून घ्या सविस्तर माहिती
Chandrayaan 3 Live: ISRO ने ट्वीट करत चांद्रयान 3 चं लँडिंग कधी, कुठे आणि कोणत्या क्षणी होणार आहे याची माहिती दिली आहे. हे लँडिंग सर्वांना लाईव्ह पाहता यावं याचीही सोय ISRO ने केली आहे.
Chandrayaan 3 Live: चांद्रयान 3 आता चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंग करण्यासाठी तयार आहे. सर्व भारतीय डोळे लावून वाट पाहत असलेल्या या क्षणासाठी आता फक्त दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. दरम्यान, भारताच्या चांद्रयान 3 आधी चंद्रावर लँडिगच्या तयारीत असणाऱ्या रशियाला मोठा धक्का बसला आहे. रशियाचं Luna-25 चंद्राच्या पृष्ठभागावर लँड होण्याआधीच स्फोट झाला आहे. मात्र भारताचं चांद्रयान 3 यशस्वी होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. याचं कारण इस्रोचे वैज्ञानिक मागील 5 वर्षांपासून चांद्रयान 3 साठी कठोर मेहनत घेत आहेत.
भारताचं चांद्रयान 3 चंद्रावर लँडिंग करेल तो क्षण सर्वांसाठी अभिमानाचा असणार आहे. हा क्षण आपल्यालाही लाईव्ह पाहता यावा अशी प्रत्येकाची इच्छा आहे. जेणेकरुन इतिहासात सुवर्णक्षरात नोंदवला जाणारा हा क्षण याची देही, याची डोळा अनुभवता यावा. जर तुमचीही अशीच इच्छा असेल तर ISRO ने खुशखबर दिली आहे. ISRO ने ट्वीट करत हे लँडिग कुठे, कधी आणि कसं पाहता येईल याची माहिती दिली आहे. यासाठी तुम्हाला बंगळुरुच्या मिशन कंट्रोल सेंटरमध्ये (Mission Control Centre) जाण्याची गरज नाही.
चांद्रयान 3 चं लँडिंग लाईव्ह पाहण्यासाठी तुम्ही या खालील लिंक्सवर क्लिक करु शकता. हे लाईव्ह 23 ऑगस्ट 2023 ला दुपारी 5 वाजून 27 मिनिटांनी सुरु होणार आहे.
लाईव्ह कुठे पाहायला मिळणार?
ISRO ची वेबसाइट - https://www.isro.gov.in/
YouTube - https://www.youtube.com/watch?v=DLA_64yz8Ss
Facebook - https://www.facebook.com/ISRO
किंवा डीडी नॅशनल टीव्हीवरही तुम्ही हे लाईव्ह पाहू शकता.
ISRO ने लोकांसाठी पाठवला संदेश
ISRO ने चांद्रयान 3 च्या लँडिगआधी संदेश दिला असून, आपण एक मोठा टप्पा गाठत असल्याचं म्हटलं आहे. चांद्रयानचं यशस्वी लँडिग व्हावं अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे. चांद्रयान 3 यशस्वी झाल्यास संसोधन, इंजिनिअरिंग, तंत्रज्ञान आणि इंडस्ट्रीला प्रोत्साहन मिळणार आहे.
23 ऑगस्टला चांद्रयान 3 लँडिग करणार आहे. संपूर्ण देशासह जगही या लँडिंगकडे आतुरतेने पाहत आहे. चांद्रयान 3 चं लँडिग एक ऐतिहासिक क्षण असणार आहे. ही मोहीम यशस्वी झाल्याने तरुण अंतराळ क्षेत्राकडे आकर्षित होतील अशी आशा आहे.