Chandrayaan 3 Launch : चांद्रयान 2 ला आलेल्या अपयशानंतर अखेर तब्बल 4 वर्षांनी इस्त्रोनं शास्त्रज्ञांच्या प्रचंड मेहनतीच्या बळावर चांद्रयान 3 मोहिम हाती घेतली. अनेक महिन्यांची मेहनत आणि आव्हानं पेलत इस्त्रोच्या चांद्रयान 3 उड्डाणाचा दिवस उजाडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून जागतिक स्तरावरील अनेक विद्वान आणि अभ्यासकांनी या मोहिमेवर लक्ष केंद्रीत करत असतानाच अखेर शुक्रवार 14 जुलै 2023 ला Chandrayaan 3 भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी अवकाशात झेपावलं आणि या यानासह भारताच्या असंख्य महत्त्वाकांक्षाही झेपावल्या. 


काय आहेत चांद्रयान 3 ची वैशिष्ट्ये? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चांद्रयानाच्या 26 तासांपूर्वीच त्याच्या उड्डाणासाठीचं Count Down सुरु करण्यात आलं. श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रावरुन हे प्रक्षेपण पार पडलं. चांद्रयान 3 ची लाँचिंगची तयारी पूर्ण होताच या तयारीचा आढावा घेण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोची रंगीत तालीमही पूर्ण झालीय आणि रंगीत तालीम 100 टक्के यशस्वी ठरली होती. 


हे चांद्रयान देशातल्या कोट्यवधी लोकांची आशा बनून निधड्या छातीनं श्रीहरीकोटात उभं होतं. त्याच्या लॉन्चिंगसाठी LVM-3-M4 रॉकेटचा वापर करण्यात आला. प्रवासाचं सांगावं तर, सुमारे 3 लाख 84 हजार किलोमीटरचा प्रवास करुन चांद्रयान-3 हे 23 किंवा 24 ऑगस्टला चंद्रावर उतरणार आहे. चांद्रयान-3 मोहिम भारतासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. चांद्रयान चंद्रावर उतरेल तेव्हा अमेरिका, रशिया आणि चीननंतर ही किमया करणारा भारत जगातला चौथा देश ठरणार आहे. 



'या' महिला शास्त्रज्ञांवर चांद्रयान 3 च्या लँडिंगची जबाबदारी 


मोहिमेसाठी 615 कोटी खर्च करण्यात आले आहेत. जवळपास 50 दिवसांच्या प्रवासानंतर चांद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ लँडिग करेल. चांद्रयान-3 च्या लँडिगची जबाबदारी महिला शास्त्रज्ञ ऋतु करिधाल (Ritu Karidhal) यांच्यावर सोपवण्यात आली आहे. ऋतु करिधाल चांद्रयान 3 च्या मिशन डायरेक्टर म्हणून भूमिका निभावत आहेत. 


ऋतु करिधाल या मूळच्या लखनऊच्या असून, चांद्रयान-3 च्या निमित्ताने मोठी भरारी घेण्याच्या तयारीत आहेत. ऋतु करिधाल यांनी आधीच्या मोहिमांमध्ये केलेली कामगिरी पाहिल्यानंतरच ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. ऋतु करिधाल मंगळयान मिशनच्या डेप्युटी ऑपरेशन डायरेक्टर होत्या. चांद्रयान-2 च्या मिशन डायरेक्टरची जबाबदारी मिळाल्यानंतर त्या चर्चेत आल्या होत्या.