Chandrayaan-3 Launch : चांद्रयान 3 ची यशस्वी झेप; देश, जगाला काय फायदा? येथे वाचा
श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रावरुन चांद्रयान 3 चं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. भारतासाठी हा अतिशय महत्त्वाचा क्षण ठरला आहे. चांद्रयान 3 ने उड्डाण केल्यानंतर शास्त्रज्ञांसह संपूर्ण देशात टाळ्या वाजवन जल्लोष करण्यात आला.
Chandrayaan-3 Launch : श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रावरुन (sriharikota satish dhawan space centre) Chandrayaan-3 चं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. 14 जुलैला घडाळ्यात 2 वाजून 35 मिनिटं झाली आणि भारताने अंतराळात एक नवीन इतिहास रचला. चांद्रयान 3 ने देशातल्या कोट्यवधी लोकांची आशा बनून निधड्या छातीनं श्रीहरीकोटातून उड्डाण केलं. लॉन्चिंगसाठी LVM-3-M4 रॉकेटचा वापर करण्या आलं आहे. सुमारे 3 लाख 84 हजार किलोमीटरचा प्रवास करुन चांद्रयान-3 हे 23 किंवा 24 ऑगस्टला चंद्रावर उतरेल. चांद्रयान-3 मिशन भारतासाठी (India) अत्यंत महत्त्वाचं मानलं जातंय. चांद्रयान चंद्रावर उतरेल तेव्हा अमेरिका, रशिया आणि चीननंतर ही किमया करणारा भारत जगातला चौथा देश बनेल... संपूर्ण जगाचं लक्ष या मोहिमेकडे लागलं आहे.
चांद्रयानाची तीन प्रमुख उद्दिष्टं आहेत
विक्रम लँडरला चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित उतरवणं
प्रज्ञान रोवर चंद्रावर चालवून दाखवणं आणि
त्यांच्या मदतीनं चंद्रावर वैज्ञानिक परीक्षण करणं
चंद्रावर लँडर सुरक्षितरित्या उतरलं की ते चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करेल. चंद्रावर भूकंप होतात का, याचाही अभ्यास लँडर आणि रोवर करणार आहेत. चांद्रयान 3 मोहीम यशस्वी झाल्यास भारतासाठी तर ते मोठं यश असेलच.. तसंच जगासाठी हा एक मोठा माईलस्टोन ठरणार आहे. कारण आजपर्यंत एकाही देशानं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवलेलं नाही.
भारत चौथा देश
अमेरिका, रशिया, चीननंतर भारत चंद्रावर यान उतरवणारा चौथा देश ठरेल तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यान उतरवणारा भारत पहिला देश ठरेल यामुळे मोहिमेमुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळच्या पाण्याचं नेमकं स्वरुप समजेल तसंच चंद्रावर माणूस पाठवण्याच्या अमेरिकेच्या मोहिमेला मदत होणार आहे. याआधी चीननं चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यान उतरवण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यात यश आलं नाही. चंद्राचा दक्षिण ध्रुव अनेक रहस्यांनी भरलेला आहे.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उणे 100 अंश तापमान असतं असं सांगितलं जातं. या भागावर सूर्यकिरणं तिरपी पडतात, त्यामुळे हा भाग अंधारातच असतो. या भागात पाण्याचा, बर्फाचा आणि खनिजांचा साठा असण्याचा अंदाज आहे. चंद्रावर पाणी किंवा बर्फ सापडलं तर त्याचा उपयोग पिण्यासाठी, उपकरणं थंड करण्यासाठी आणि रॉकेट इंधन तयार करण्यासाठी केला जाईल . जर पाणी आणि खनिजाचा शोध चांद्रयानामुळे लागला तर जगासाठी हे मोठं यश असणार आहे