Big News : Chandrayaan 3 चंद्राच्या जवळ असतानाच...; फोटोसह इस्रोनं दिली मोठी बातमी
Chandrayaan 3 Latest Upadate : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं चांद्रयान 3 चं प्रक्षेपण करून महिना उलटला आणि आता हे यान अतिशय महत्त्वाच्या वळणावर आलं आहे.
Chandrayaan 3 Latest Upadate : जवळपास महिन्याभराच्या प्रवासानंतर इस्रोच्या चांद्रयानानं आता चंद्राच्या आणखी जवळ पाऊल ठेवलं आहे. 14 ऑगस्ट रोजी चांद्रयानानं चंद्राच्या वर्तुळार कक्षेत प्रवेश केला होता. याआधी हे यान चंद्राभोवती अंडाकृती कक्षेत परिक्रमा घालत होतं. आता मात्र यान चंद्रापासून अवघ्या 153 किमी x 163 किमी इतक्या अंतरावर असल्याची माहिती नुकतीच इस्रोनं दिली आहे.
बुधवारी सकाळी 8 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास चांद्रयान 3 चं चंद्रापासूनचं अंतर कमी होईल असं इस्रोकडून सांगण्यात आलं होतं. पण, चांद्रयानाच्या प्रवासातील या टप्प्यासाठी इस्रोनं माहिती देण्यास काही मिनिटांचा उशिर केला आणि अनेकांची चिंता वाढली. चांद्रयान 3 चंद्रापासून काही अंतरावर असतानाच कमीत कमी वेळासाठी इस्रोकडून एक फायरिंग करण्यात आली.
X वरून दिलेल्या माहितीनुसार या फायरिंगमुळं यान चंद्रापासून 153 किमी X 163 किमी इतक्या अंतरावर पोहोचलं. या टप्प्यावरच चांद्रयानाच्या कक्षा कमी करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती इस्रोनं दिली. ज्यानंतर आता चांद्रयानाचा यापुढील आणि तितकाच महत्त्वपूर्ण प्रवास सुरु होणार आहे.
चंद्राजवळ तर पोहोचलो आता पुढे काय?
ISRO च्या माहितीनुसार चांद्रयान 3 यापुढं आता प्रोपल्शन आणि लँडर मॉड्युलच्या विभक्तीकरणासाठी तयार होईल. थोडक्यात यानापासून लँडर वेगळं होत त्याचा स्वतंत्र प्रवास करणार आहे. प्रोपल्शन मॉड्युलपासून लँडर 17 ऑगस्ट रोजी वेगळं होणार असल्यामुळं आता शास्त्रज्ञांचीही धाकधुक वाढली आहे.
हेसुद्धा वाचा : Aditya L1 Launch : चंद्रामागोमाग सूर्यावरही इस्रोची नजर; Photo सह पाहा नव्या मोहिमेची तयारी कुठवर आली...
....आणि चंद्रावर पोहोचणार चांद्रयान
प्रोपल्शन मॉड्यूलपासून लँडर वेगळं झाल्यानंतर चांद्रयान 3 च्या चंद्रावरील सॉफ्ट लँडींगची प्रतीक्षा असेल. जिथं लँडर थ्रस्टर्सच्या मदतीनं चंद्राच्या पृष्ठावर साधारण 30 किमीच्या उंचीवर लँडिंग करेल. 23 ते 24ऑगस्ट दरम्यान ही प्रक्रिया सुरु असेल. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर विक्रम लँडरच्या लँडिंगनंतर प्रज्ञान रोवर त्यातून बाहेर येईल आणि चंद्राच्या पृष्ठावर फिरेल. ही संपूर्ण मोहिम यशस्वी ठरल्यास चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत पहिला देश ठरणार असून हा ऐतिहासिक क्षण असेल.