Vikram Lander Pragyan Rover:  चांद्रयान-3 मोहिमेच्या यशानंतर जगभरातून इस्रोचे कौतुक केले जात आहे. इस्रोने पाठवलेले लँडर 'विक्रम' आणि रोव्हर 'प्रज्ञान' यांनी आपली भूमिका चोखपण बजावली आहे. चंद्राच्या वातावरणातील अत्यंत महत्वाची माहिती त्यांनी इस्रोला पाठवली आहे. या माहितीची इस्रोला पुढील मोहिमेत मदत होणार आहे. दरम्यान विक्रम आणि प्रज्ञान सध्या काय करतायत? याबद्दल साऱ्यांच्याच मनात उत्सुकता लागली आहे. इस्रोने याबद्दल महत्वाचे अपडेट दिले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताचे चांद्रयान-3 मोहिमेसाठी पाठवण्यात आलेले  लँडर 'विक्रम' आणि रोव्हर 'प्रज्ञान' सध्या स्लीप मोडमध्ये आहेत. चंद्रावर रात्र पडली आहे. त्यामुळे  त्यांना इस्रोकडून 22 सप्टेंबर रोजी जागे होण्याची कमांड दिली आहे. आता चंद्रावर सप्टेंबरनंतरच दिवस उजाडणार आहे. पण त्यानंतर विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर कार्यरत स्थितीत असतील की नाही? हे सांगणे फारच कठीण आहे. 


चंद्राचा एक दिवस किंवा रात्र पृथ्वीच्या 14 दिवस किंवा रात्री बरोबर असते. त्यामुळे सध्या तिथे रात्र सुरु आहे. यापूर्वी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उपस्थित असलेल्या विक्रम आणि प्रग्यानने चंद्राविषयी नवीन माहिती दिली आहे. 


विक्रम आणि प्रज्ञानने पाठवलेली माहिती एकत्र करुन शास्त्रज्ञ सध्या चांद्रयान-३ मिशनचा तपशीलवर डेटा तयार करत आहेत. चांद्रयान 3 चे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर काही काळासाठी बंद करण्यात आल्याची माहिती इस्रोनेच अलीकडेच दिली होती. चंद्रावर रात्र असून पारा खूपच कमी असल्याने प्रज्ञान सध्या काम करू शकणार नाही, अशी माहिती देण्यात आली होती.


यापूर्वी, चांद्रयान-3 च्या प्रज्ञान रोव्हरमध्ये वाहून नेलेल्या पेलोडने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ऑक्सिजन असल्याची पुष्टी केली. खुद्द इस्रोने ट्विट करून ही माहिती दिली. तसेच चंद्रावर सल्फरच्या अस्तित्वाचीही पुष्टी झाली. इतकेच नव्हे तर विक्रम लँडरला चंद्रावर भूकंपासारखी कंपनेही जाणवली आहेत. हे कंपन २६ ऑगस्ट रोजी पाच सेकंदांसाठी नोंदवले गेले. यानंतर इस्रोची टीम या कंपनावर सतत संशोधन करत आहे. भूकंपासारखे कंपन असे त्याचे वर्णन करण्यात आले.


ISRO ने रविवारी चंद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानाशी संबंधित आलेख जारी केला होता. चंद्राच्या पृष्ठभागाच्या थर्मो भौतिक प्रयोगाने दक्षिण ध्रुवाभोवती चंद्राच्या वरच्या मातीचे तापमान प्रोफाइल केले असून ते 70 अंश सेंटीग्रेड होते, अशी माहिती इस्रोने दिली.