नागरिकांच्या तक्रारीनंतर CoWIN पोर्टलमध्ये मोठे बदल, लस घेण्याआधी समजून घ्या !
पोर्टलवरील नोंदणीशी संबंधित समस्यांमुळे लोक गोंधळले होते.
नवी दिल्ली : देशभरात लोकांना कोरोना लस (Vaccination) घेण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. पण लसीचा अभाव आणि पोर्टलवरील नोंदणीशी संबंधित समस्यांमुळे लोक गोंधळले होते. दरम्यान यंत्रणा सुधारण्यासाठी सरकार पूर्णपणे सज्ज आहे. याच अनुशंगाने कोविन पोर्टलमध्ये (CoWIN Portal) महत्त्वपूर्ण बदल केले गेले आहेत. या बदलांद्वारे काही तक्रारी (Complaints) दूर केल्या गेल्या आहेत. तसेच अशा काही सुविधा जोडल्या गेल्या आहेत. यामुळे नोंदणी सुलभ होणार आहे.
1 मेपासून सरकारने 18 वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण सुरू केले आहे. त्यासाठी कोविन पोर्टलवर नोंदणी केली जात आहे. पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने लोकांनी नाव नोंदणी केली होती. तेव्हापासून यासंदर्भात लोकांच्या अनेक प्रकारच्या तक्रारी येऊ लागल्या. लोकांनी सोशल मीडियावर उघडपणे या समस्यांचा उल्लेख केला. हे लक्षात घेऊन सरकारने आता कोविन पोर्टलमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत.
कोविन पोर्टलवर (CoWIN Portal) झालेल्या बदलांमधील सर्वात मोठा बदल म्हणजे डिजिटल कोड वैशिष्ट्य. आता नोंदणीच्या वेळी वापरकर्त्याच्या मोबाइलवर 4 अंकी डिजिटल सुरक्षा कोड येईल, जो सुरक्षितपणे ठेवावा लागेल. लसीकरणानंतर हा कोड लसीकरणास द्यावा लागतो. त्यानंतरच संबंधित व्यक्तीची लस स्थिती सुधारली जाईल. इतकेच सांगायचे तर तुम्हाला लसी दिल्यानंतरच हे गृहित धरले जाईल.
लसीकरण (Vaccination) न करता देखील लसीकरण पूर्ण झाल्याचा मेसेज मिळत असल्याच्या तक्रारी अनेकांनी केल्या. ज्यानंतर हे नवे फिचर जोडले गेले आहे. हे बदल 8 मे पासून म्हणजे आजपासून लागू होतील. यानंतर कोडशिवाय लसीकरण होणार नाही. कोविन प्रणालीवर अंमलात आणलेले हे नवीन फिचर लसीकरणासाठी ऑनलाईन बुकिंगसाठी आहे.
आरोग्य सेतु (Aarogya Setu) ने दिलेल्या माहितीनुसार, लसीकरण केंद्रात 4 अंकी डिजीटल कोड (Digital Security Code) दाखवल्यानंतर लस दिली जाईल. या व्यतिरिक्त, जर आपल्याला लसीकरणानंतर डिजिटल प्रमाणपत्र (Certificate) तयार करायचे असेल तर आपल्याला पोर्टलवर आपला कोड टाकावा लागेल. यानंतर, आपल्याला लस यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचा मेसेज मिळेल. पण जर मेसेज आला नाही तर आरोग्य केंद्राला त्याबद्दल सांगावे लागेल.