रेल्वेच्या लांबच्या प्रवासात झोपायच्या वेळेत बदल
रेल्वेतून लांबचा प्रवास करत असताना आरक्षित डब्ब्यातील सीटवर झोपण्याच्या वेळेत एक तासाची घट करण्यात आलीय.
मुंबई : रेल्वेतून लांबचा प्रवास करत असताना आरक्षित डब्ब्यातील सीटवर झोपण्याच्या वेळेत एक तासाची घट करण्यात आलीय. या आरक्षित डब्ब्यातील प्रवासी आता रात्री १० ते सकाळी ६ या कालावधीत झोप घेऊ शकतात. या संदर्भात रेल्वेने एक परिपत्रक काढले आहे.
इतर प्रवाशांना सीटवर बसण्याची संधी प्राप्त व्हावी हे यामागचे कारण असल्याचे रेल्वेने स्पष्ट केलंय. यापूर्वी आरक्षित डब्ब्यात झोपण्याची वेळ रात्री 9 ते सकाळी सहा अशी ठेवण्यात आली होती. आता ती वेळ एक तासाने कमी करण्यात आली आहे.
नव्या परिपत्रकानुसार आजारी, दिव्यांग आणि गर्भवती महिला प्रवाशांना या नव्या नियमातून सूट देण्यात आलीय. असे प्रवासी रात्री दहा वाजण्याआधीही झोप घेऊ शकणार आहेत. रेल्वेतून लांबचा प्रवास करताना झोपण्यावरुन होणारे वाद, भांडणे होतात. नव्या नियमामुळे हे वाद आणि भांडणं थांबतील अशी आशा रेल्वेला आहे.